यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा ; महापौर बाबासाहेब वाकळेंचे आवाहन

कोरोनामुळे काळजी घेण्याची गरज : वाकळे

 


नगर, (दि.13 नोव्हेंबर) : नगरकरांनी यंदाच्या दिवाळीत फटाके न उडवता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करताना महापौर वाकळे यांनी कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त केली. 

 

यावेळी बोलताना ते म्हणाले की,  सात ते आठ महिन्‍यापासून संपूर्ण जगामध्‍ये कोरोना विषाणूमुळे हाहाकार माजला आहे. यामध्‍ये अनेक निष्‍पाप नागरिकांचा जीव गेला आहे. अनेक ना‍गरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्‍यातून ते बरे झाले. पण कोरोनाचे सावट अजूनही संपलेले नाही. 

 

नगर शहरामध्‍ये कोराना रुग्‍णांमध्‍ये बऱ्याच प्रमाणात घट झाली असून कोरोनावर मात करण्‍यासाठी नागरिकांनी मास्‍क, सोशल डिस्‍टसिंग, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्‍यक आहे. सध्‍या दिवाळी उत्‍सवामुळे बाजारपेठेत मोठया प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्‍कचा वापर करणे आवश्‍यक आहे. 

 

तसेच दुकानदारांनी देखील खरेदी करण्‍यासाठी येणाऱ्या नागरिकांना मास्‍क लावल्‍याशिवाय दुकानात प्रवेश देवू नये. आपल्‍या दुकानातील कामगारांना देखील मास्‍क वापरण्याबाबत सक्‍ती करण्‍यात यावी. नागरिकांनी मास्‍कचा वापर केला नाही तर मनपास दंडात्‍मक कारवाई करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

कोरोनाची दुसरी लाट येण्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात येत आहे. नागरिकांनी स्‍वत:ची काळजी घेवून कोरोनावर मात करण्‍याच्‍यादृष्टीने शासनाने दिलेल्‍या निर्देशाचे पालन करावे. कोरोनाचा संसर्ग पाहता दिवाळी सणामध्‍ये फटाके वाजवू नये, फटाके वाजविल्‍यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांच्‍या फुफ्फुसावर विपरित परिणाम होवू शकतो. त्‍यामुळे कोरोना रुग्‍ण व सर्वसामान्‍य नागरिक यांच्‍या आरोग्‍याला धोका निर्माण होतो. 

 

त्याचप्रमाणे  फटाके वाजवल्‍यामुळे शहरामध्‍ये मोठया प्रमाणात प्रदूषण होईल. त्य़ामुळे फटाके न वाजवता प्रदूषण मुक्‍त दिवाळी साजरी करावी. यामुळे नागरिकांचे आरोग्‍य चांगले राहील. मनपाच्‍या कोरोनासाठी आवश्‍यक असणाऱ्या उपाय योजना करीत आहे. परंतु नागरिकांनी देखील दिलेल्‍या निर्देशाचे पालन केल्‍यास कोरोनामुक्‍त शहर होण्‍यास मदत होईल. 

 

नागरिकांनी बाजार पेठेत, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये व गर्दी असलेल्‍या ठिकाणी मास्‍कचा वापर करावा व नागरिकांनी आपल्‍या आरोग्‍याची काळजी घ्‍यावी, असे आवाहन महापौर वाकळे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post