नगर, (दि.25 नोव्हेंबर) : दुर्गप्रेमी ठाकुरदास परदेशी व त्यांचे कुटुंबीय गेल्या दहा वर्षापासून दिवाळी निमित्त आपल्या घराच्या आवारात महाराष्ट्रातील एखाद्या किल्ल्याची हुबेहुब प्रतिकृती तयार करतात. यंदा त्यांनी सिंहगड (कोंढाणा) किल्ल्याची प्रतिकृती माती, शेण, बारदान इत्यादीचा वापर करून साकारली आहे.
आठ फुट रुंद व चार फुट ऊंचीची ही प्रतिकृती आहे. ही प्रतिकृती शांतीकुंज, शांतीनगर पाण्याच्या टाकी जवळ, नामगंगा रिसॉर्टच्या पुढे, शांतीनगर, अहमदनगर या ठिकाणी सर्वांना पाहण्यासाठी दि.30/11/2020 पर्यंत खुली आहे. अधिक माहितीसाठी मो.9860207076 या नंबरवर संपर्क साधावा.
दुर्गप्रेमी ठाकुरदास परदेशी यांनी गेल्या सोळा वर्षा पासून एकून 175 गड किल्ल्यांना भेटी दिल्या आहेत. लोकांना विशेषत: लहान मुलांना गड किल्ल्यांची माहिती व्हावी म्हणून प्रतिकृती तयार करण्याचा उपक्रम ते राबवतात. आतापर्यंत त्यांनी शिवनेरी, तोरणा, राजगड, पुरंदर, रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग इ. किल्ल्यांची प्रतिकृती साकारली आहे.