टाळेबंदी काळातील सर्वसामान्यांची वीज बिले माफ करण्याची मागणी
सर्वसामान्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव न ठेवणार्या राज्य सरकारचा निषेध
नगर, (दि.20 नोव्हेंबर) :टाळेबंदी काळातील सर्वसामान्यांची वीज बिले माफ झाली नसल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आम आदमी पार्टीचे शहर जिल्हा संघटक प्रा. अशोक डोंगरे, शहराध्यक्ष राजेंद्र कर्डिले, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सुचिता शेळके, रेव्ह. आश्विन शेळके, प्रज्वल डोंगरे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलन सुरु करण्यात आले. तर सर्वसामान्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव न ठेवणार्या राज्य सरकारचा निषेध नोंदवून घोषणा देण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. तर बहुतांश नागरिकांच्या नोकर्या गेल्या आहेत. सर्वांची आर्थिक परिस्थिती गंभीर असल्याने रोजच्या उदरनिर्वाहाचा, मुलांच्या शिक्षणाचा, आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
अनेक नागरिकांनी परिस्थिती गंभीर असल्याने वीज बील भरलेले नाही. तर काहींनी उसने व व्याजाने पैसे घेऊन वीज बीलाचा भरणा केला आहे. या परिस्थितीमध्ये आम आदमी पार्टीने सातत्याने टाळेबंदी काळातील वीज बील माफ करण्याची मागणी केली होती. मात्र राज्य सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत असून, टाळेबंदी काळातील वीज बील माफ करण्याचा निर्णय न घेतल्याने राज्य सरकारच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.