मुदतबाह्य अन्नपदार्थाचा साठा करणार्‍यांवर कारवाई

मिठाई तयार करणार्‍या दुकान, गोदामावर छापा



नगर,(दि.06 नोव्हेंबर) : शहरामधील मिठाई तयार करण्याचे दुकान व गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी छापा टाकून मुदतबाह्य अन्नपदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. यामधुन आता मुदतबाह्य अन्नपदार्थ ठेवणार्‍यांचे धाबे दणानले आहे.


येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी संबंधित फराळ विक्रीचे दुकान व गोदामातून मुदतबाह्य झालेली मिरची पावडर, व्हिनेगार, रामबंधू चिवडा मसाला, प्रकाश चिवडा मसाला, काळी मिरी मसाला, डिस्को पापड, शुभश्री जिरा खाकरा, बदाम थंडाई सिरप आदी अन्नपदार्थांचे दीडशेपेक्षा जास्त पाकिटे  आदी व 74 बाटल्या जप्त केल्याची माहिती मिळाली आहे.


या मुदतबाह्य अन्नपदार्थांपासून दिवाळीचा फराळ व मिठाई तयार होत असल्याचे अधिकार्‍यांना आढळून आले आहे. अन्नपदार्थ तयार करत असताना नियमांचे पालन होत नसल्याचेही समोर आले. तपासणीदरम्यान दुकान मालकाने अन्न व सुरक्षा अधिकार्‍यांना दमदाटी करून कारवाईत अडथळा निर्माण केला. 

 

अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सं. पां. शिंदे यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, कारवाईत अडथळा निर्माण केल्या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याने व्यावसायिक व ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post