मुंबई, (दि.07 नोव्हेंबर) :राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असताना अखेर राज्य सरकारच्या वतीने आज १२ नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सरकारच्यावतीने संसदीय कार्यमंत्री अॅड.अनिल परब, अल्पसंख्याक कार्यमंत्री नवाब मलिक आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची राजभवन येथे भेट घेऊन बंद लखोट्यात ही यादी सादर केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सही असलेल्या पत्रासोबत बंद लखोट्यात ही यादी राज्यपालांना देण्यात आली आहे. त्यामुळे अधिकृतरित्या या यादीतील नावे जाहीर करण्यात आलेली नसली तरी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर व राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे व काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत ही नावे यादीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यपाल आता यावर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Tags:
Maharashtra
