पुणे (दि. 18 सप्टेंबर) : अतिवृष्टीमुळे राज्यामधील शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या शेतकर्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने सरसरकट आर्थिक मदत करावी. याच बरोबर केंद्र सरकारने देखील यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक आणि अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर यांनी केली आहे.
शेतकरी संकटात असताना नापिकी, कर्जबाजारीपणा आणि कोरोनाच्या महामारीमुळे आर्थिकदृष्टया शेतकरी कोलमडला गेला असल्याचे चित्र आहे. त्यामध्येच आता शेतकर्यांवर अतिवृष्टीची अवकृपा झाली आहे. या संकटामधून शेतकर्यांना वाचवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मदत केली पाहिजे असे पासलकर म्हणाले.
यंदा अतिवृष्टीची सर्वाधिक झळ विदर्भ, मराठवाड्यातील शेतकर्यांना बसली आहे. या भागात या अगोदर कोरडा दुष्काळ पाहिला मिळाला आहे. पण यावर्षी ओल्या दुष्काळाचा सामना त्यांना करावा लागत आहे.
पासलकर पुढे म्हणाले की, राजर्षी शाहू सोशल फाउंडेशन, अखिल भारतीय शिव महोत्सव समिती आणि संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शेतकर्यांच्या 50 मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
