आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती सक्षम करा : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
जिल्हा परिषदेत कृषी दिन उत्साहात साजरा
। अहिल्यानगर । दि.01 जुलै 2026 । बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती, जलसंधारण, पीक विविधीकरण व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून कृषी क्षेत्र अधिक सक्षम करणे ही आजची गरज आहे. कृषी विभाग, कृषी विद्यापीठे व शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन करून कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा कृषी अधिकारी सुधीर शिंदे, आत्मा प्रकल्प संचालक प्रदीप लाटे, पशुसंवर्धन उपायुक्त उमेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सर्वांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देत सांगितले की, एल-निनोच्या प्रभावामुळे यावर्षी राज्यात व जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. जुलै महिन्यातही पर्जन्यमान कमी राहण्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभाग व कृषी विद्यापीठांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. आपल्या तालुक्यातील हवामान, मातीचा प्रकार आणि उपलब्ध पाण्याचा विचार करून कमी पाणी लागणाऱ्या पिकांची निवड करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात रुंद वाफा - सरी पद्धतीचा वापर अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात होत आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात या पद्धतीचा प्रभावी वापर होत असून, कमी पर्जन्यमानाच्या परिस्थितीतही पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरते. त्यामुळे कृषी विभागाने या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रसार करावा आणि शेतकऱ्यांनीही त्याचा अवलंब करावा.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. जिल्हा कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले की, शेतकऱ्यांचा विकास आणि आर्थिक प्रगती झाल्याशिवाय राज्य आणि देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. एल-निनोच्या प्रभावामुळे यावर्षी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून जलसंवर्धनाला प्राधान्य द्यावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, समूह शेती, सूक्ष्म सिंचन, यांत्रिकीकरण आणि वैज्ञानिक शेती पद्धतींचा अवलंब केल्यास शेती अधिक फायदेशीर होईल. शेतकऱ्यांनी केवळ उत्पादक न राहता कृषी उद्योजक म्हणून पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
