कामगारांसाठी कल्याणकारी उपक्रम राबविणार : चंद्रकांत राऊत

नूतन जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त 

राऊत यांचे  हमाल पंचायतीच्यावतीने स्वागत


नगर, (दि.04 ऑक्टोबर) : नूतन सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांचे अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने अध्यक्ष अविनाश घुले यांनी स्वागत केले. याप्रसंगी उपाध्यक्ष गोविंद सांगळे, शेख रज्जाक शेख लाल, सचिव मधुकर केकाण, पी.व्ही.लोंढे, विलास उबाळे, केरबा पोळ आदि उपस्थित होते.


याप्रसंगी नूतन जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत म्हणाले, शासनाच्यावतीने कामगार, हमाल, असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा फायदा जास्तीत जास्त कामगारांना होण्यासाठी कामगार कार्यालय नेहमीच प्रयत्नशील असते.


आपण नव्याने या ठिकाणी आलो आहोत, नगर जिल्हा हा क्षेत्रफळाने मोठा जिल्हा आहे, त्यामुळे काम करतांना सर्वांचे सहकार्य लागणार आहे. कामगारांसाठी कल्याणकारी उपक्रम राबविणार आहोत. जिल्ह्यातील हमाल पंचायतीचे काम चांगले असल्याचे ऐकून होता. आता त्यांच्या उपक्रमातून दिसून येत आहे. पुढील काळात कामगार कार्यालयाच्यावतीने त्यांना सहकार्य केले जाईल, असे सांगितले.


याप्रसंगी अविनाश घुले म्हणाले, कामगार कार्यालयाच्यावतीने कामगारांच्या विविध प्रश्न, योजनांबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असतो. यापूर्वी हमाल पंचायतीच्यावतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांना त्यांचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. नूतन सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांनी विविध ठिकाणी काम केले आहे, त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्यातील कामगारांना नक्कीच होईल, असा विश्वास व्यक्त केला.


याप्रसंगी गोविंद सांगळे, पी.व्ही.लोंढे यांनी जिल्ह्यातील कामगारांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. शेख रज्जाक शेखलाल यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post