नगर, (दि.03 ऑक्टोबर) :नाफेडमार्फत शासकिय आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पारनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सोयाबिन खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सभापती प्रशांत गायकवाड यांनी दिली. प्रति क्विंटल 3 हजार 880 रूपये या आधारभुत किमतीने सोयाबिन खरेदी केले जाणार आहे.
शेतकर्यांनी आपला शेतमाल वाळवून, काडी कचरा, मुकणी विरहीत तसेच इतर धान्य, दगड माती न मिसळता स्वच्छ करून आणावा. गुरूवार दि. 1 ऑक्टोबरपासून बाजार समितीच्या कार्यालयात शेतमालाची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शेतकर्यांनी सोयाबिन या पिकाची नोंद असलेला तलाठ्याच्या सहीचा सात बारा उतारा, आठ अ, आधारकार्ड झेरॉक्स तसेच मोबाईल नंबर देउन ऑनलाईन नोंदणी करावी.
ऑनलाईन नोंदणीनंतर माल खरेदीबाबत शेतकर्यांना मोबाईलवर संदेश पाठवून कळविण्यात येईल. त्यानंतर नाफेडच्या ग्रेडरने स्विकारलेल्या मालाची खरेदी करण्यात येईल. माल खरेदीनंतर नाफेडमार्फतच शेतकर्यांच्या मालाची रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच शेतकर्यांच्या खात्यावर जमा केली जाईल. या योजनेचा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सभापती प्रशांत गायकवाड, उपसभापती विलास झावरे, सचिव शिवाजी पानसरे यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.
