नगर (दि.13 ऑगस्ट ) : नगर शहरासह उपनगरामध्ये आज गुरवारी सकळपासूनच पावसाची रिपरिप सुरु झाली होती. ही रिपरिप दिवसभर सुरु होती. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात अनेक भागामध्ये कमी-जास्त प्रमाणात आज पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे.
धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप असल्याने पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. भंडारदरा, मुळा धरण परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. चोवीस तासात घाटघर येथे सुमारे पावणेपाच इंच तर रतनवाडी येथे चार इंच पावसाची नोंद झाली आहे.
भंडारदरा धरणात होणार्या नवीन पाण्याची आवक विचारात घेता पाणलोटात व कळसुबाई शिखराच्या पर्वतरांगा मध्ये पावसाचा जोर वाढल्याने 15 ऑगस्टपर्यंत धरण भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
चोवीस तासात पाणलोटात घाटघर येथे 165 मीमी तर रतनवाडी येथे 155 मीमी, पांजरे येथे 145 मीमी तर भंडारदरा येथे 140 मीमी पावसाची नोंद झाली. भंडारदरा धरणात मागील चोवीस तासात 519 दलघफु नवीन पाण्याची आवक झाली यामुळे धरणात 8 हजार 236 दलघफु यापर्यंत पाणीसाठा पोहचला होता.
नगर शहराबरोबर उपनगरामध्ये पावसाची रिपरिप सुरु असली तरी हवामान विभागाने 13 ऑगस्ट पर्यंत जिल्हयात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
