श्रीरामपूर, (दि.28) : कौटुंबिक वादातून पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घातला. जखमी झालेल्या या महिलेचा मंगळवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. पतीने रात्री रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथे घडली. राजन याने मंगळवारी दुपारी तीन वाजता पत्नी शिल्पाच्या डोक्यात दगडी पाटा टाकला. घरात असलेल्या लहान मुलीने वडिलांचे कृत्य पाहिले. आरडाओरडा करत काही अंतरावर असलेल्या आपल्या आजीच्या घरी जात तिने हा प्रकार सांगितला.
नातेवाईक आले असता शिल्पा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. नातेवाईक व सरपंच सुनील शिरसाठ यांनी तिला तातडीने श्रीरामपूर येथील कामगार रुग्णालयात हलवले. तेथील डॉक्टरांनी लोणीतील रुग्णालयात नेण्यास सांगितले. रात्री उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेनंतर राजन पसार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. रात्री संजयनगर परिसरातील आदर्श कारखान्याच्या रेल्वे गेटसमोर राजनने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघड झाले. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
Tags:
Crime
