घर घर लंगरसेवेचे सिक्किमच्या राज्यपालांकडून कौतुक

अर्ध्या रात्री रेल्वे स्टेशनवर दीड हजार प्रवाश्यांना
 फुड पॅकेट व पाणी बॉटलचे वितरण

नगर,(दि.25) : लॉकडाऊनच्या काळात शहरात अडकलेले परप्रांतीय मजूर, हातावर पोट असलेले कामगार व गरजूंना जेवण पुरविणार्‍या घर घर लंगर सेवेच्या वतीने विविध राज्यात रेल्वेने जाणार्‍या प्रवाश्यांना देखील नगर रेल्वे स्टेश्‍न येथे फुड पॅकेट व पाण्याची बॉटल देण्याचा उपक्रम चालू आहे. पंजाबमधून नगरला मध्यरात्री आलेल्या रेल्वेमधील प्रवाश्यांची एका फोनवर काही तासातच जेवणाची सोय करणार्‍या घर घर लंगर सेवेचे सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी कौतुक केले. तर सेवा चालविणारे सहकारी व पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहे.

महाराष्ट्रातून पंजाबमध्ये सोने, चांदी व्यवसायात गलाई काम करण्यासाठी गेलेले व्यापारी व कारागीरांना महाराष्ट्रात आणण्यासाठी अमृतसर येथून विशेष रेल्वे सोडण्यात आली. यामध्ये पुणे, सातारा व सांगली येथील नागरिक होते. या रेल्वेतील प्रवाश्यांची जेवणाची सोय करण्यासाठी सिक्किमचे राज्यपाल पाटील यांनी पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांना संपर्क साधला होता. लंगर सेवेच्या सहकार्‍यांनी रात्री तातडीने दिड तासात जेवण तयार केले. तर सदर रेल्वे नगर रेल्वे स्टेशनवर रात्री 12 वाजता आली असता, प्रवाश्यांना दिड हजार फुड पॅकेटचे आणि 70 पाण्याचे बॉक्स वितरण करण्यात आले.

एका फोनवर सामाजिक भावनेने प्रवाश्यांना जेवण पुरविल्याबद्दल अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील, पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके, पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे, घर घर लंगरसेवेचे हरजितसिंह वधवा, अभिजीत लुणिया, किशोर मुनोत, राहुल बजाज, संदेश रापरीया, जस्मितसिंह वधवा, सनी वधवा, गोविंद खुराणा, विकी मेहेरा, गुरभेज सिंग, सिर वधवा, रोहित टेकवाणी, टोनी कुकरेजा, सुनिल छाजेड, अंकित भुटानी, बलजीत बिलरा, विपुल शहा आदि सामाजिक कार्यकर्ते व पोलीसांचे आभार सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी पत्राद्वारे मानले आहे. घर घर लंगरसेवेने नगरमधून परराज्यात गेलेल्या 6 रेल्वे गाड्यामधील साडे तीन हजार प्रवाश्यांना फुड पॅकेट व पाण्याच्या बाटल्या पुरविल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post