उपरणे, टोपीच्या जागी मास्क,
सॅनीटायझर देऊन पाहुण्यांचे स्वागत
नगर,(दि.25) : लॉकडाउन असल्याने नगर एमआयडीसीतील उद्योजकाने स्वतःच्या कंपनीतच पुतणीचा आज विवाह केला. ढोल-ताशांचा गजर न करता साध्या पद्धतीने विवाह सोहळा झाला. या विवाहात जमलेल्या पाहुण्यांचे स्वागत उपरणे, टोपी टावेल न देता मास्क, सॅनीटायझर देऊन करण्यात आले. अशा आगळ्या विवाह सोहळ्याची चर्चा आज नगर शहराच्या उपनगरात रंगली होती.
नगर एमआयडीसीमध्ये श्री आशिष इंडस्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेड ही यंत्रांचे सुटे भाग बनविणारी कंपनी आहे. या कंपनीत यंत्रांची घरघर, हातोड्यांचे आवाज ही नित्याची बाब असते. पण आज लॉकडाउनमध्ये या कंपनीत मंगलाष्टकांचे मंगल सूर घुमले. श्री आशिष इंडस्ट्रिजचे संचालक उद्योजक बाळासाहेब साठे यांची पुतणी महेश्वरी मधुकर साठे व चास (तालुका नगर)चे सरपंच पोपट भागाजी घोंगार्डे यांचे चिरंजीव सुहास यांचा विवाह आज सकाळी ९.३० वाजता झाला. लॉकडाउनमुळे वधु-वर दोन्ही बाजूकडील जवळच्या नात्यातील मोजकीच ३० ते ४० मंडळी विवाह सोहळ्यात बोलावण्यात आली.
विवाह सोहळ्यात मोठा थाटात करण्याचे टाळण्यात आले. विवाह सोहळ्यासाठी कंपनीचा परिसर सजविण्यात आला. कंपनीच्या प्रवेशद्वारावरच यजमानांकडून पाहुण्यांचे स्वागत सॅनीटायझर, मास्क व अक्षदा देऊन करण्यात आले. सोशल डिस्टन्स संदर्भातील शासकीय नियमांचे पालन करत विवाह सोहळा विधीवत करण्यात आला. कोरोना विषाणूंमुळे देशातील सर्व क्षेत्रांवर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे पाहुण्यांकडून कोणत्याही स्वरूपाचा आहेर स्वीकारण्यात आले नाहीत. विवाह सोहळ्या नंतर उपस्थितांना वधु-वरांच्या हस्ते अंब्याचे रोप देऊन वृक्षारोपन करण्याचा संदेशही देण्यात आला.यावेळी उपस्थितांना आरोग्याची काळजी घ्या. कोरोना विषाणू संसर्गजन्य आहे. त्यामुळे शासकीय नियमांचे पालन करा असा संदेश यजमानांकडून देण्यात आला. या विवाह सोहळ्याच्या आयोजनात जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, नगरसेवक दत्ता सप्रे, माजी नगरसेवक पोपट बारस्कर आदींनी महत्त्वाची भुमिका बजावली.
Tags:
Ahmednagar
