भारतात लोकशाही रुजविण्यात पं.नेहरु यांचे मोठे योगदान
नगर स्थापना दिनाच्या शुभेच्छा ! .. पर्यटन स्थळांचा विकास व्हावा
नगर, (दि.27) : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवहरलाल नेहरु यांचा 56 वा स्मृतिदिन आज बुधवार (दि.27) अहमदनगर शहर काँग्रेसतर्फे साजरा करण्यात आला. तांगेगल्ली येथील कार्यालयात पं.नेहरु यांच्या प्रतिमेला गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश जनरल सेक्रेटरी फिरोज शफी खान, भिंगार काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. आर. आर. पिल्ले, पत्रकार राजेश सटाणकर उपस्थित होते. शहर काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, सदस्यांनी झुम अॅपवर पं. नेहरु यांना अभिवादन केले. पं.नेहरु यांच्या कार्याचा गौरव केला.
दिडशे वर्षाच्या पोलादी ब्रिटीश सत्तेनंतर 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी देशाचे नेतृत्व पं.नेहरुंच्या हाती आले. पंतप्रधान पदाच्या कारकीर्दीत त्यांनी देशात लोकशाही रुजवून समाजवाद, धर्मनिरपेक्ष राष्ट्राची उभारणी केली. जगातील सर्वात मोठे प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून भारताची जी ओळख निर्माण झाली तिची पाळेमुळे नेहरुंच्या काळात रुजविण्याचा प्रयत्न झाला. आधुनिक भारतात औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ याच काळात झाला. अशा अनेक घटनांचा यावेळी विविध वक्त्यांनी उल्लेख केला.
पं.नेहरु यांची जयंती व पुण्यतिथी गेल्या पन्नास वर्षांपासून अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात साजरी केली जात होती. प्रारंभीच्या काळात किल्ल्यातील पं.नेहरुंची खोली बंद असतांना काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी खोलीच्या कडी कोयड्याला पुष्पहार अर्पण करुन नेहरुेंना आदरांजली वाहिली होती. यंदा प्रथम ही पुण्यतिथी किल्ल्याबाहेर पक्षाच्या तांगेगल्ली संपर्क कार्यालयात होत आहे, असे भिंगार काँग्रेसचे अध्यक्ष अॅड.आर.आर.पिल्ले यांनी यावेळी सांगितले.
नगर हे ऐतिहासिक शहर असून, या शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी येथील ऐतिहासिक पर्यटन स्थळांचा विकास व्हावा, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी योजना राबवाव्या, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली. शहर स्थापना दिनाच्यानिमित्ताने फिरोज खान यांनी ही मागणी केली.
दोन-अडीच महिन्याच्या लॉकडाऊनच्या काळात नगरकर जनता जनार्धन यांनी घरातून कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सामना केला, परंतु आता घराबाहेर पडून कामधंदा करण्याशिवाय गत्यंतर नाही, त्यामुळे घराबाहेर पडतांना लोकांनी सुरक्षित अंतर ठेवून, मास्कचा वापर करुन, र्निजंतूकीकरण, स्वच्छता आदि बाबी कटाक्षाने पाळावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी शहर काँग्रेसच्या इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होऊन आदरांजली अर्पण केली.
Tags:
Ahmednagar
