बुलडाणा (दि.22) : जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर क्षेत्रात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या वाहनावर शनिवार दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता, त्यामध्ये (पातुर्डा ता.संग्रामपूर) येथील सीआरपीएफचे जवान चंद्रकांत भगवंतराव भाकरे (वय 38) हे शहीद झाले. त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी पातुर्डा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पातुर्डा ग्रामस्थ व उपस्थितांनी साश्रुनयनांनी चंद्रकांत भाकरे यांना अखेरचा निरोप दिला.
चंद्रकांत भाकरे यांच्यामागे आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, मुलगा व मुलगी असा मोठा परिवार आहे. भाकरे यांचा शेती हा मूळ व्यावसाय असून परिवाराकडे 4 एकर शेती आहे. दोघे भाऊ शेती करतात. चंद्रकांत भाकरे यांचे पार्थिव श्रीनगरमार्गे विशेष विमानाने दिल्ली व तेथून नागपूरला आणण्यात आले. तेथून रात्री शेगावला पार्थिव पोचले. सोमवारी सकाळी 7 वाजता त्यांचे पार्थिव पातुर्डा गावात नेण्यात आले.
शहीद जवानाच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी आपापल्या घरांमधून गर्दी केली होती. प्रत्येक घरातून पार्थिवावर फुले उधळण्यात आली. ‘भारत माता की जय, वंदे मातरम, शहीद जवान अमर रहे, चंद्रकांत भाकरे अमर रहे’ अशा घोषणा दुमदुमत होत्या.
यावेळी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी बुलडाणा सुमन चंद्र, खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय कुटे, दिलीप भुजबळ, वैशाली देवकर, तहसीलदार समाधान राठोड, सरपंच श्रीमती शैलजाताई भोंगळ, सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी एस.पी.महेश्वरी, संजय लाटकर, संजय कुमार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर पार्थिवाला सीआरपीएफ 179 बटालियन कडून बंदुकीतून तीन वेळा हवेत फैरी झाडून सलामी देण्यात आली. चंद्रकांत यांचे भाऊ तुषार व जयंत यांनी चिताग्नी दिला.
Tags:
Maharashtra
