गटई कामगारांना आधार द्यावा : चर्मकार विकास संघाची मागणी

चर्मकार विकास संघाच्या वतीने

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गटई कामगारांना आर्थिक मदतीचा आधार देण्याची मागणी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सामाजिक न्यायमंत्री यांना निवेदन

नगर (दि.22) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात एक महिन्यापासून लॉक डाऊन चालू आहे. यामुळे हातावर पोट असलेल्या कष्टकरी गटई कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असल्याने त्यांना आर्थिक मदतीचा आधार देण्याची मागणी चर्मकार विकास संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, प्रदेश सचिव प्रा.सुभाष चिंधे, मुंबई प्रदेशाध्यक्ष सुभाष मराठे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रस्त्याच्या कडेला बसून कष्टकरी गटई कामगार आपल्या व कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो. सध्या देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉक डाऊन पुकारण्यात आला आहे. गेल्या एक महिन्यापासून लॉक डाऊन चालू आहे. त्यामुळे कष्टकरी गटई कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी शासनाने त्यांना त्वरित आर्थिक मदत देऊन आधार देण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

महाराष्ट्रात कष्टकरी गटई कामगारांना त्वरित दर महिन्याला सात हजार रुपये प्रमाणे मार्च, एप्रिल व मे तीन महिन्यासाठी मदत द्यावी, महाराष्ट्रातील विशेष करून ग्रामीण भागातील गटई कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून गटई स्टॉल सुरू करण्यास परवानगी द्यावी, कोरोना हा विषाणू जमिनीच्या पृष्ठभागावरुन पसरत असल्याने बूट, चपला मधून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असल्याने गटई कामगारांना कोविड 19 ची संरक्षण कीट देण्यात यावी, हा धोका ओळखून गटई कुटुंबाला 20 लाखाचा आरोग्य विमा देण्यात यावा, मार्च, एप्रिल, मे असे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करण्याची मागणी चर्मकार विकास संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post