कोरोनाच्या लॉक डाऊनने प्रदुषण घटल्याने गावात पक्ष्यांचा किलबिलाट


निमगाव वाघात पक्ष्यांची पाणपोई सुरु

उन्हाळ्यानिमित्त डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम

नगर, (दि.16) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉक डाऊनमुळे शहरासह शहरालगत असलेल्या गावात प्रदुषण कमी झाल्याने पक्ष्यांचा किलबिलाट पहावयास मिळत आहे. तर दिवसं-दिवस उन्हाची तीव्रता वाढत असताना पक्षी पाण्यासाठी भटकंती करीत आहे. नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने गावात पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी पाणपोई सुरु करण्यात आली आहे.

मागील दुष्काळात पिण्यासाठी पाणी न मिळाल्याने पक्ष्यांना जीव गमवावा लागला होता. ही जाणीव ठेऊन संस्थेच्या वतीने दरवर्षी उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्यात येते. यावर्षी लॉक डाऊनमुळे प्रदुषण मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने पक्ष्यांची संख्या देखील वाढल्याचे निदर्शनास येत आहे. रिकाम्या पडलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, कॅन, ड्रम कापून तर गाडगे झाडाला दोरीने लटकवून गावात पक्ष्यांची पाणपोई उभारण्यात आलेली आहे. या पाणपोईत दररोज सकाळी पाणी टाकण्याचा संस्थेच्या प्रतिनिधींचा दिनक्रम ठरलेला आहे. संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.

पक्षी हे नैसर्गिक चक्राचा घटक असून, पिकांवरील रोगराई कमी करण्यासाठी देखील त्यांची मदत होते. त्यांना जगविणे ही मनुष्याची नैतिक जबाबदारी असून, नागरिकांना देखील घराच्या गच्छीवर व गॅलरीत पक्ष्यांच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी केले आहे. या उपक्रमासाठी पै.नाना डोंगरे, सचिव मंदा डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, उद्योजक कोंडीभाऊ फलके, बाबूराव जाधव, शासनाचा आदर्श युवती पुरस्कार प्राप्त प्रियंका डोंगरे, सोमनाथ डोंगरे, आदर्श माता द्रोपदा डोंगरे, मयुर काळे, तेजस्विनी डोंगरे, पै.स्वराज डोंगरे, कार्तिक डोंगरे आदि परिश्रम घेत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post