एकमेकांविरोधात संघर्ष करण्याची ही वेळ नाही : शरद पवार

मुंबई (दि.16) : राजकारणात राजकीय संघर्ष आपण नेहमी करत असतो. त्यात चुकीचे नाही. त्या गोष्टी चालतच असतात. परंतु संपूर्ण देशावर आज संकट आले आहे. त्यावेळी एकमेकांविरोधात संघर्ष करण्याची ही स्थिती नाही. कोण, कुठल्या पक्षाचे सरकार आहे किंवा दिल्लीत कुठल्या पक्षाचे राज्य आहे, हे आजच्या घडीला महत्त्वाचे नाही. आज सगळ्यांनी मिळून कोरोनाचा पराभव करायचा हा एककलमी कार्यक्रम आपल्यापुढे आहे. त्यादृष्टीने पावले टाकली पाहिजेत, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांना दिला.

बुधवारी चौथ्यांदा शरद पवार यांनी जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. मंगळवारी वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ एक दुर्दैवी घटना घडली. कुणी तरी रेल्वे सुटणार आहे, अशी आवई उठवली. त्यामुळे दुर्दैवाने सोशल डिस्टन्सिंगच्या सूचना पाळल्या गेल्या नाहीत. त्या ठिकाणी पोलीस बळाचा वापर झाला. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल, अशा प्रकारच्या घटना घडू नये, असेही ते म्हणाले. सबंध विश्वात आज कोरोनाची चर्चा आहे. कोरोनामुळे प्रचंड संकट व्यापक प्रमाणात देशावर आले आहे. त्याचा सामना धैर्याने व योग्य पद्धतीने नियोजन करून केला पाहिजे.

जागतिक पातळीवर ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी होते. भारत सरकार, राज्य सरकार, संपूर्ण शासकीय यंत्रणा, वैद्यकीय क्षेत्रातील घटक, डॉक्टर्स, नर्सेस व त्यांचे सहकारी कोरोनाला पराभूत करण्यासाठी धैर्याने उभे आहेत, असेही पवार म्हणाले. पंतप्रधानांनी संपूर्ण देशाला काही सूचना केल्या. काही कार्यक्रमांची मांडणी केली. त्यांनी जी भूमिका मांडली त्याला पूर्णपणे सहकार्य करण्याची खबरदारी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

आर्थिक संकटावर पुन्हा भाष्य
 
आर्थिक संकटाबाबत पुन्हा एकदा शरद पवार यांनी भाष्य केले. आज अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला आहे. शेती असो किंवा शेतीत पिकलेले धान्य आहे त्याला आज बाजारपेठ नाही. एपीएमसी मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचा उपयोग होईल. पण राज्याचा विचार केला तर आज अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाला मार्केट नाही. त्यामुळे हातातील पीक सोडून देण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे. उद्योग बंद आहेत. त्याचाही परिणाम मोठा झाला आहे. बँकेचे व्याज वाढत आहे. त्याशिवाय आणखी एक संकट पुढे आले आहे ते म्हणजे बेकारी, बेरोजगारी. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढेल अशाप्रकारचे चिन्ह दिसत आहे, अशी भीतीही शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. 

मुख्यमंत्री निधीला सीएसआर फंड हवा

केंद्र सरकार सीएसआर फंड वापरत आहे. ती रक्कम राज्याच्या मुख्यमंत्री रिलीफ फंडाला उपलब्ध करून दिली पाहिजे. तसे झाले तर राज्याला या कामासाठी मदत होईल, असेही पवार म्हणाले.


Post a Comment

Previous Post Next Post