कोरोना मोहिमेतील कर्मचार्‍यांना 1 कोटीचे विमा संरक्षण हवे


अन्यथा अन्नत्याग आंदोलन - कर्मचारी युनियनचे अनंत लोखंडे

नगर (दि.14) : कोव्हीड 19 प्रतिबंधक उपाययोजना व त्या संबंधी मोहिमेत ज्या शासकीय विभागातील कर्मचार्‍यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत, अशा कर्मचार्‍यांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत विमा संरक्षण देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारने आदेश दिलेले आहेत. महापालिकेचे सुमारे दीड हजार कर्मचारी या उपाययोजना राबविण्यात व सेवा पुरविण्यात सक्रिय आहेत. या सर्व कर्मचार्‍यांना एक कोटी रुपयांचे विमा संरक्षण व सुरक्षा कवच द्यावे. दोन दिवसात याबाबत निर्णय घ्यावा. अन्यथा 17 एप्रिल पासून कर्मचारी अन्नत्याग आंदोलन सुरू करतील, असा इशारा महापालिका कामगार युनियनने दिला आहे

मनपा आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर मनपाने कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासकीय विभागातील 1500 कर्मचार्‍यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. यात शिपाई, लिपिक, अभियंता ते आयुक्तांपर्यंतचा समावेश आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे.

त्यामुळे या सर्व कर्मचार्‍यांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत एक कोटी रूपयांचे विमा संरक्षण देण्यात यावे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या विमा योजनेत भाग घेतला आहे. त्याच धर्तीवर आपल्या महानगरपालिकेने या योजनेत भाग घेवून दोन दिवसात तातडीने याची घोषणा करावी. अन्यथा शुक्रवार दि. 17 पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुुरु करण्यात येईल, असे या निवेदनात लोखंडे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post