पुणे-नगर रस्त्यावर ड्रोनद्वारे नजर

 
पुणे,(दि..14) : कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे सावट देशभर पसरले आहे. प्रशासनाने संचारबंदी कायदा सर्वत्र लागू केला असून, अद्यापही नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याने लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील वाघोली, केसनंद, लोणीकंद, वाडेबोल्हाई, पेरणे, अष्टापूर, पिंपरी सांडस, डोंगरगाव, शिरसवडी, बिवरी, आव्हाळवाडी, कोलवडी, मांजरी खुर्द, बकोरी, तुळापूर, फुलगाव, वढू खुर्दमध्ये वारंवार सांगूनही कायद्याचे पालन होत नाही. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील काही मोठ्या गावांवर ड्रोन कॅमेऱ्यांची व्यवस्था केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक संदिप पाटील यांनी घेतलेल्या निर्णयानुसार वाघोली येथे पुणे-नगर महामार्गावर व परिसरात ड्रोनद्वारे वाहनांचे व नागरिकांचे चित्रीकरण होत आहे.

यामध्ये विनाकारण फिरत असणाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यामध्ये संचारबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सांगितले.

वाघोली व पालिकेच्या हद्दीत खांदवेनगर जकात नाका येथे पुणे शहर व ग्रामीण पोलीस, तर वाघोलीतील केसनंद फाटा येथेही लोणीकंद पोलिसांनी नाकाबंदी करून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

दहा मोटारसायकली जप्त

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी असूनही काम नसताना फिरणाऱ्या दहा जणांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून १० मोटारसायकल १५ दिवस जप्त केल्या आहेत. लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक हनुमंत पडळर, पोलीस हवालदार गणेश शेंडे, होमगार्ड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post