मोठे कार्य पार पाडण्यासाठी सांघिकता व एकजूट महत्त्वाची : राजश्री घुले

 
जिल्हा परिषदेच्या आदर्श कर्मचारी पुरस्कारांचे व क्रीडा सांस्कृतिक स्पर्धाचे बक्षिस वितरण

नगर :  जिल्हा परिषदेचे कामकाज हे थेट ग्रामीण भागाशी निगडीत आहे. ग्रामीण भागात विकासगंगा पोहचविण्याचे काम करणारी जिल्हा परिषदेची प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम असली पाहिजे. नगर जिल्हा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धात अधिकारी, कर्मचार्‍यांनी आपल्यातील सुप्त कलागुण, क्रीडा नैपुण्याचे दर्शन घडवले. या उपक्रमातून उर्जा प्राप्त झालेले कर्मचारी आपल्या कामातही नवचैतन्य आणून कर्तव्य अधिक चांगल्या रितीने बजावतील. याशिवाय आदर्श कर्मचारी पुरस्कार प्राप्त कर्मचार्‍यांची जबाबदारीही पुरस्कारामुळे वाढली आहे. मोठे कार्य पार पाडण्यासाठी सांघिकता व एकजूट महत्त्वाची असते. ही भावना वृध्दींगत होण्याचे काम स्पर्धेमुळे निश्चितच झाले आहे. अशा उपक्रमांना नेहमीच पाठबळ दिले जाईल, असे प्रतिपादन जि.प.अध्यक्षा राजश्री घुले यांनी केले.

अहमदनगर जिल्हा परिषदेच्यावतीने कर्मचार्‍यांसाठी घेण्यात आलेल्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे पारितोषिक वितरण तसेच आदर्श जिल्हा परिषद कर्मचारी पुरस्कारांचे वितरण अध्यक्षा घुले यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपाध्यक्ष प्रताप शेळके, सभापती काशिनाथ दाते, सुनिल गडाख, उमेश परहर, मीरा शेटे,  जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे, प्रभावती ढाकणे, शरद नवले, संगिता दुसुंगे, सभापती संगिता जोर्वेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, सुभाष कराळे, विकास साळुंके, किशोर शिंदे आदी उपस्थित होते.

जगन्नाथ भोर म्हणाले की, . सरकारने आता पाच दिवसांचा आठवडा लागू केलेला आहे. हा निर्णय घेताना सरकारने कामकाजाची वेळ वाढवली आहे. त्याचे तंतोतंत पालन करून कर्मचार्‍यांनी आपले कर्तव्य पूर्ण निष्ठेने बजावले पाहिजे. जिल्हा परिषद ही विकासाभिमुख व लोकाभिमुख यंत्रणा आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्तव्य बजावण्यावर भर दिला पाहिजे. कर्मचार्‍यांनी मैदानात जशी कला क्रीडा संस्कृती दर्शवली. तशीच चांगली कार्यसंस्कृती आपल्या दैनंदिन कामकाजात रूजवली पाहिजे.

प्रास्ताविकात वासुदेव सोळंके म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. 1200 कर्मचारी क्रीडा स्पर्धेत तर 300 कर्मचारी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. सर्व स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. या उपक्रमासाठी सर्व पदाधिकार्‍यांनी सहकार्य करीत निधी उपलब्ध करून दिला. स्पर्धेत दाखवलेली उत्स्फूर्तता कर्मचार्‍यांनी त्यांच्या कामातही दाखवली पाहिजे. आदर्श कर्मचारी पुरस्कार प्राप्त झालेल्यांचा आदर्श ठेवून इतरांनाही तसे काम केले पाहिजे.  सरकारने कर्मचार्‍यांना चांगल्या सोयीसुविधा दिल्या आहेत. आता कर्मचार्‍यांनीही जनतेची कामे अधिक जलद व प्रभावी कसे होतील हे कटाक्षाने पाहिले पाहिजे.

Post a Comment

Previous Post Next Post