एसटीच्या प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखद : एसटीत येणार ३५४२ लालपरी
मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागात लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीची लालपरी आता सुरक्षित-सुखकर प्रवासासोबतच अद्ययावत होणार आहे. कारण येत्या नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल २०२० ते मार्च २०२१ दरम्यान एसटीच्या ताफ्यात नव्या ३५४२ लालपरी म्हणजे साध्या परिवर्तन बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे एसटीच्या प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखद होण्यास मदत होणार आहे.
गेल्या आठवड्यात सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात १६०० नवीन लालपरी बसेस खरेदी करण्यासाठी २०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्याबरोबरच महामंडळ स्वत: १९४२ नव्या लालपरी बसेस बांधणार आहे. या बसेस जुन्या सांगाड्यावर नव्याने मजबूत अशा माईल्ड स्टीलमध्ये पुनर्बांधणी केल्या जाणार आहेत. अशा २०५० बसेस सध्या एसटीच्या ताफ्यात आहेत. या बसेसची बांधणी करताना सुखकर प्रवासाबरोबरच सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने रचनात्मक बदल केले आहेत. त्यामुळे इतर साध्या बसेसच्या तुलनेत या नव्या लालपरी बसेसचे अपघाताचे प्रमाण अत्यल्प असेल, असा विश्वास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे.
गेली काही वर्ष १० लाख कि.मी. प्रवास ओलांडलेल्या सुमारे ३ हजार जुन्या बसेस नाईलाजास्तव प्रवासी सेवेत महामंडळाने ठेवल्या होत्या. याबाबत अनेक तक्रारी, टीका झाल्यानंतर नवे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने प्रवासी सेवेतून काढून घेऊन त्याठिकाणी नवीन बसेस देण्यात येतील, अशी घोषणा केली होती.
Tags:
Maharashtra
