कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभर जाणार्‍या एसटी चालक व वाहकांना मास्कचे वाटप


प्रॉमिनंट फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ इंटिग्रेटीचा उपक्रम

नगर : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसंदिवस वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर दक्षतेचा उपाय म्हणून राज्यभर प्रवास करणार्‍या एसटी चालक व वाहकांना प्रॉमिनंट फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ इंटिग्रेटीच्या वतीने मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. तारकपूर बस स्थानक येथे इतर जिल्ह्यातून आलेले एसटी ड्रायव्हर व वाहकांसह फेरीवाले, खाद्य पदार्थ विक्रेते, सुरक्षा रक्षकांना या मास्कचे वाटप करुन, कोरोना संबंधी माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. 

यावेळी प्रॉमिनंट फाऊंडेशन व रोटरी इंटिग्रेटीचे अध्यक्ष जावेद शेख, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, डॉ.अभिजीत शिंदे, रोटरीचे माजी प्रांतपाल शिरीष रायते, मनिष बोरा, डॉ. हेमांगिणी पोतनीस, वाहतुक निरीक्षक माने, थावरे, मुठाळ, सहा. वाहतुक निरीक्षक अविनाश गायकवाड, अमोल सोमवंशी, सादिक शेख आदिंसह एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, रोटरीचे व प्रॉमिनंट फाऊंडेशनचे सहकारी उपस्थित होते.

प्रास्ताविकात जावेद शेख म्हणाले की, महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसंदिवस वाढत आहे. एसटी महामंडळाचे चालक व वाहक यांचा सर्वच जिल्ह्यातील नागरिकांशी जवळून संबंध येतो. हा आजार रोखण्यासाठी उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. यासाठी तातडीने एसटी चालक व वाहकांना मास्क देण्याचा उपक्रम राबवून कोरोना टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी संदर्भात त्यांना मार्गदर्शन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ.अभिजीत शिंदे म्हणाले की, कोरोना आजारास घाबरुन जाण्याचे कारण नसून, ते टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक काळजी घेतली गेली पाहिजे. हा आजार चायना मधून पसरुन जगभर पसरला आहे. कोरडा खोकला, ताप, डोके दुखी, दम लागणे ही याची लक्षणे असून, या विषाणूची लागण झालेले रुग्ण बरे होणारे आहेत. यापासून वयोवृध्द व्यक्तींना धोका आहे. सेनेटायझरचा बाजारात तुटवडा असून, साध्या साबणाने जरी स्वच्छ हात धुतल्यास याचे विषाणू नाहिसे होतात. नागरिकांनी उघड्यावरचे खाणे टाळूण प्रथिनेयुक्त आहाराचा समावेश करावा. तर मास्क घालण्यासंदर्भात त्यांनी योग्य मार्गदर्शन केले. डॉ. हेमांगिणी पोतनीस यांनी कोरोनासह इतर आजार टाळण्यासाठी आहार व व्यायामाचे महत्त्व सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post