नगर : देशात सध्या कोरोना आजाराची अफवा जोरात असली तरी त्यातुनही आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने आज शिवजयंतीच्या बंदोबस्तात असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांना नगर शहर व तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले आहे. बंदोबस्तात आरोग्याकडे दुर्लक्ष होवू नये तसेच कोणत्याही आजाराची पोलिसांना लागन होवू नये यासाठी हे मास्क वाटप करण्यात आले आहे.
शहरामध्ये विविध मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, मिरवणुका आयोजित केलेल्या आहेत. यानिमित्त शहरातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येणार आहे. सध्या भारत देशामध्ये करोना या आजाराची भीतीचे सावट आहे. पोलिस खात्यातील कर्मचारी आपल्या संरक्षणाची जबाबदारी चोखपणे पार पाडत असतात. गरजेच्या ठिकाणी त्यांना जावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आपले कर्तव्य समजून त्यांना केमिस्ट असोसिएशनच्यावतीने मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष दत्ता गाडळकर, भरत सुपेकर, भुपेंद्र खेडकर, देविदास काळे, कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विकास वाघ, पी.एस.आय. बाळासाहेब खामकर, सचिन गोरे, मनोज गुंजाळ आदी उपस्थित होते.
Tags:
Ahmednagar
