नगर-मनमाड रस्त्याने बेकायदेशीररित्या दारू तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्या मद्यार्काची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. माहितीनुसार पथकाने ट्रक चालकला अडविले. या वेळी या ट्रकमध्ये मद्यार्काचे 75 पिंप त्यात प्रत्येकी 340 लिटर मद्यार्क असे एकूण 18 हजार लिटर अवैध मद्यार्क आढळून आले. या वेळी वाहनचालक इंद्रसिंग गुलाब भिल (वय 38 रा. वाडी ता. शिरपूर जि. धुळे) व चंदू अर्जुन वानखेडे (42 रा. आमोदा ता. शिरपूर जि. धुळे) यांना अटक करण्यात आली.
ट्रकच्या पिंपामधील मद्यार्काचे नमुने पृथक्करणासाठी घेण्यात आले असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे. अहवालानंतर जप्त केलेले रसायन कशापासून तयार करण्यात आले आहे, याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी उत्पादन शुल्कचे जवान प्रवीण साळवे यांनी आरोपींविरोधात फिर्याद दिली आहे. रविवारी अटक केलेल्या दोघांना राहाता न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अनिल पाटील, निरिक्षक संजय सराफ, अण्णासाहेब बनकर, भैय्यासाहेब घोरतळे यांच्यासह प्रकाश अहिरराव, कैलाश छत्रे, धवल गोलेकर, अजित बडदे, दुय्यम निरीक्षक विकास कंठाळे, प्रवीण साळवे, राजेंद्र कदम, जवान दीपक बर्डे, वर्षा जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Tags:
Ahmednagar
