बारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक
जालना (दि.23) : महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. या दरम्यानच एका शिक्षकानेच पेपर फोडल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. जालन्यामधील परतूरमध्ये हा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. पेपर फोडल्या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकासह आठ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
जालना जिल्ह्यातील परतूर हे तालुक्याचं ठिकाण आहे. येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयात बारावीची प्रश्नपत्रिका शिक्षकाकडूनच बाहेर पाठवल्या गेल्याचा प्रकार समोर उजेडात आला आहे. हा शिक्षक झेरॉक्स सेंटर चालकाला व्हॉट्सअॅपवरून प्रश्नपत्रिका पाठवत असल्याची बाब समोर आली आहे. यानंतर काही जणांचा गट विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचे काम करायचे अशी माहिती पुढे येत आहे.
जालना येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात बारावीची परीक्षा सुरु असताना हॉल क्रमांक 20 वरील पर्यवेक्षकासमोरच या शिक्षकाने प्रश्नपत्रिकेचे मोबाईलवर फोटो काढले होते. बारावीच्या हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका बाहेर आणून त्याची उत्तरे लिहिली गेली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर झेरॉक्स मशीनमध्ये त्याच्या प्रति काढून विद्यार्थ्यांना कॉफी पुरवण्यात आल्याचा आरोप या शिक्षकावर करण्यात आला आहे.
प्रश्नपत्रिका व्हॉटसअॅपवरुन बाहेर पाठवल्या जात असल्याची माहिती मिळताच आयपीएस अधिकारी निलेश तांबेंसह परतूर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यानी पेपर फोडल्याप्रकरणी आठ जणांवर परतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्यावर भांदवी 188 कलम 5, 6, 7 महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड गैरव्यवहार प्रतिबंध अनव्ये गुन्हाची नोंद केली आहे. पोलिसांनी परीवेक्षकासह आठ जणांना ताब्यात घेतले आहे.
Tags:
Maharashtra
