ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन


। अहिल्यानगर । दि.12 ऑक्टोबर 2026 । लोक रंगभूमी, नाटक, मालिका व मराठी, हिंदी चित्रपटातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे आज सकाळी ७ वाजता येरवडा येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे व ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन बहिणी,  एक भाऊ, मुलगा,  सून व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी ५ वाजता येरवडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.


नोव्हेंबर 2016 मध्ये माटुंगा येथील नाट्यगृहात लावणीचा कार्यक्रम सादर करत असतानाच त्यांना अर्धांगवायूचा झटका येऊन त्या नृत्य करत असतानाच रंगमंचावर कोसळल्या होत्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होत त्यामुळे त्या सलग ९- १० वर्षे अंथरुणावर खेळून होत्या.


मधू कांबीकर या मूळच्या शेवगाव तालुक्यातील कांबी या गावच्या रहिवासी होत्या. कांबी पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मालेगाव या गेवराई तालुक्यातील छोट्याशा खेडेगावात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे बालपण कांबी या गावामध्ये गेले तर ७ वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबी येथे झाले.


पुढे पुणे आणि कोल्हापूर येथे जाऊन त्यांनी लावणीचे नृत्य प्रशिक्षण घेतले. तत्पूर्वी गेवराई, बीड या भागात संगीत बारी कलाकेंद्रातही त्यांनी काही काळ नृत्य केले. पुढे पुण्याच्या आर्यभूषण थिएटर मध्ये आणि त्यानंतर लालबाग परळ येथील हनुमान थिएटर मध्ये त्यांनी आपली पार्टी चालवली. पुत्र कामेष्टी या नाटकाद्वारे १९८० साली त्यांचे रंगभूमीवर पदार्पण झाले.


पुढे नाटक, मालिका, चित्रपट, हिंदी चित्रपट क्षेत्रात यशस्वी झाल्यानंतर त्यांनी सखी माझी लावणी हा अस्सल पारंपरिक लावण्यांचा कार्यक्रम देखील सुरू केला होता. कांबी हे आपले गाव आणि शेवगावशी संबंध होता. तीन भाऊ, तीन बहिणी आणि आई वडील असे त्यांचे मोठे कुटुंब होते.


वडिलांच्या निधनानंतर त्यांनी कांबी या आपल्या गावात एक सार्वजनिक वाचनालय सुरू केले होते. तर दरवर्षी दिवाळीला त्या हमखास कांबी या गावी सुट्टीसाठी येत असत. त्याचबरोबर नगर जिल्ह्यात कुठेही लोककलेशी संबंधित काही कार्यक्रम किंवा लोककलावंतांचा मेळावा असेल तर त्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहत असत. शेवगावच्या मार्केट यार्ड मध्ये काही वर्षांपूर्वी अशाच एका लोककलावंतांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

त्या कार्यक्रमास देखील मधुकांबीकर उपस्थित होत्या आणि कार्यक्रम संपल्यानंतर काही काळ त्या शेवगावच्याच डॉ. कुलकर्णी यांच्या बंगल्यात चहापानासाठी थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांची मुलाखत घेण्याचा योग आला होता. त्यावेळी त्यांनी लोक रंगभूमी, लावणी, लोककला, मराठी, हिंदी चित्रपट यासंदर्भात भरभरून बोलल्या होत्या.


त्यांची आपल्या कांबी येथील शिव मंदिरावर खूप अपार अशी श्रद्धा होती. त्यांच्या आई शशिकला यादेखील नृत्य कलावंत होत्या. त्यामुळे नृत्याचे प्राथमिक धडे त्यांना आपल्या आईकडूनच मिळाले. पुढे त्यांनी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्याकडून नृत्याचे धडे घेतले पांडुरंग घोटकर गुरुजी यांनी त्यांना ढोलकी वर साथ दिली. त्यांच्यासोबत त्यांच्या बहिण रत्नाताई नेहमी असत.


सिंदखेड राजा जवळील पिंपरी राजा येथील विश्वास आनंद महाराजांच्या मंदिराच्या बांधकामासाठी त्यांनी सखी माझी लावणी या कार्यक्रमाचे प्रयोग सादर करून आर्थिक मदत गोळा करून दिली होती. 1981 च्या सुमारास दिल्ली येथे झालेल्या लोककला महोत्सवात त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत फुगडी खेळली होती.


सुरुवातीच्या काळात त्यांनी देवापुढे माणूस, सौभाग्य दान, दगा, लक्ष्मी अशा काही चित्रपटात छोट्या भूमिका साकारल्या होत्या. राजदत्त दिग्दर्शित शापित या चित्रपटाद्वारे खऱ्या अर्थाने त्यांचे मराठी चित्रपटात पदार्पण झाले. त्यानंतर हेच माझे माहेर, आज झाले मुक्त मी, नाना पाटेकर सोबतचा राघू मैना हा तमाशापट, निखारे, देवा शपथ खरं सांगेन, बिनकामाचा नवरा, जुलूम इत्यादी चित्रपटात त्यांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या.


1980 ते 90 या दशकामध्ये रंजना नंतर विविध व्यक्तीरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री म्हणून मधू कांबीकर यांची चर्चा सुरू झाली होती. कधी तमाशाच्या बोर्डावर नाचणारी नृत्यांगना तर कधी सोज्वल गृहिणी, सोशिक आई किंवा ठसकेबाज ग्रामीण स्री अशा विविध रंगी भूमिका त्यांनी आपल्या अभिनयातून साकारल्या., एक होता विदूषक या जब्बार पटेल दिग्दर्शित मराठी चित्रपटासाठी त्यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली होती.


त्याचबरोबर दादा कोंडके, महेश कोठारे, सचिन या दिग्गज अभिनेता निर्माता दिग्दर्शकांसोबतही त्यांनी अनेक चित्रपटातून भूमिका साकारल्या. नाना पाटेकर यांच्यासोबत राघू मैना या मराठी चित्रपटानंतर तब्बल २५ वर्षांनी त्यांनी नाना पाटेकर यांच्यासोबत हम दोनो या हिंदी चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यानंतर गोविंदाची मध्यवर्ती भूमिका असलेल्या शोला और शबनम या चित्रपटात देखील त्यांनी आपली भूमिका साकारली

पुढे सातवा आसमान, दिल तुने लिया, जगन्नाथ अशा अनेक हिंदी चित्रपटातून त्या झळकल्या. होळी रे होळी, बिचारा लक्षा, गिनीपिग, न्यायदेवता, वैभव, सर्जा राजा या त्यांच्या दूरदर्शन मालिका खूप गाजल्या.

2013 मध्ये मधू कांबीकर यांना पद्मश्री दया पवार सांस्कृतिक पुरस्कार मिळाला होता. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील अगस्ती महाविद्यालयात आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड आणि महाविद्यालयाचे प्राचार्य रमेशचंद्र खांडगे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता. प्रेमानंद रूपवते यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले होते.

Post a Comment

Previous Post Next Post