। अहिल्यानगर । दि.12 ऑक्टोबर 2026 । जास्त सोन्याच्या आमिषाने फसवणूक करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली आहे. या कारवाईत घारगाव, नेवासा, कोपरगाव, मिरजगाव येथील चार गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच 6 लाख 60 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फिर्यादी सोपान पोपटराव डोलनर (रा. चिखलठाण, ता.राहुरी) यांची आई साकुर बसस्थानक, ता. संगमनेर येथे बसलेल्या असताना अनोळखी तीन आरोपींनी त्यांना फसविले. फिर्यादीच्या आईने गळयातील सोन्याचे मंगळसूत्र आरोपींना काढून दिले.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, अंमलदार निळकंठ कारखेले, राहुल द्वारके, गणेश लोंढे, विशाल तनपुरे, रोहित मिसाळ, भगवान सानप, फुरकान शेख, प्रशांत राठोड यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला.
सदरचा गुन्हा हा सचिन संजय गायकवाड (रा.औरंगपूर, ता.शिरूर, जि.बीड) याने साथीदारासह केल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकास तो खरवंडी, ता.पाथर्डी परिसरात मिळून आला. त्याने सदरचा गुन्हा साथीदार संतोष मोहनराव चिंतामणी (रा.नाळवंडी नाका, ता.जि.बीड), शहादेव रामदास जाधव (रा. वडवणी, ता.जि.बीड), आबा तुपे (पुर्ण नाव माहित नाही रा.औरंगपूर, ता.शिरूर, जि.बीड) यांच्यासह केल्याची माहिती दिली.
पथकाने संतोष मोहनराव चिंतामणी यास ताब्यात घेतले. आरोपी सचिन गायकवाड याने साथीदारांसह मिरजगाव, नेवासा व चांदेकसारे (ता.कोपरगाव) येथे जास्तीचे सोने देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करून सोन्याचे दागिने घेतल्याचे पोलिसांना सांगितले. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
