जिल्हा परिषदेचा राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम - 'नवरात्री - स्वच्छता उत्सव'

। अहिल्यानगर । दि.08 ऑक्टोबर 2026 । शारदीय नवरात्रौत्सव दि. ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत साजरा होत आहे. नवरात्र काळात ग्रामीण भागात महिला, युवती, बचत गट, अंगणवाडी व शाळांमधील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने एकत्र येतात. या गर्दीच्या संधीचा उपयोग स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण जनजागृतीसाठी व्हावा, या उद्देशाने जिल्हा परिषद, पाणी व स्वच्छता विभाग अहिल्यानगर मार्फत ‘नवरात्री - स्वच्छता उत्सव’ हा राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

आनंद भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अहिल्यानगर यांच्या निर्देशानुसार प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन यांनी सर्व गट विकास अधिकारी यांना आदेश जारी केले आहेत. सदर उपक्रमांतर्गत तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत खालील ९ स्पर्धांचे आयोजन करणे बंधनकारक राहील.


उपक्रमाचा मुख्य उद्देश:
१) नवरात्र मंडप व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचा संदेश देणे.
२) महिलांमध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ बाबत जागरूकता.
३) प्लास्टिक मुक्त उत्सव साजरा करणे.
४) युवती व बचत गटांचा स्वच्छतेत सक्रिय सहभाग.

स्पर्धांचा सविस्तर तपशील:

१) स्वच्छता रांगोळी स्पर्धा: देवीच्या आवारात स्वच्छता संदेश देणारी रांगोळी. साहित्य - फुलं, हळद-कुंकू, ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट.

२) कचऱ्यापासून टिकाऊ सजावट (Best from Waste): टाकाऊ वस्तूंपासून देवीच्या मखराची व तोरणाची सजावट.

३) देवीचा पोशाख - पुनर्वापर थीम: जुन्या साड्या, वर्तमानपत्र, कापडाचा पुनर्वापर करून देवीचा पोशाख.

४) स्वच्छता प्रश्नमंजुषा: बचत गट व विद्यार्थिनींसाठी SBM, ODF Plus, घनकचरा नियमावर Quiz.

५) स्वच्छ मंडप व दांडिया स्पर्धा: ज्या मंडपात कचरा पेटी, ४ प्रकारात कचरा वर्गीकरण व स्वच्छता असेल त्याला पुरस्कार.

६) स्वच्छ घर, स्वच्छ अंगण स्पर्धा: गावातील १० घरांची निवड, घर व अंगण स्वच्छता तपासणी.

७) प्लास्टिक मुक्त घटस्थापना: घटस्थापना व प्रसादासाठी प्लास्टिकचा वापर टाळणाऱ्या मंडळांना सन्मान.

८) सेल्फी विथ स्वच्छता पॉईंट: स्वच्छता कॉर्नर तयार करून सेल्फी स्पर्धा, #SwachhNavratri हॅशटॅग.

९) स्वच्छता क्वीन स्पर्धा: ग्रामीण भागातील घनकचरा नियम २०२६ अंतर्गत घरात निर्माण होणारा कचरा ४ प्रकारात (ओला, सुका, घरगुती घातक, सॅनिटरी) वेगळा करेल व शेजारच्या दहा कुटुंबांना कचरा वर्गीकरणासाठी प्रोत्साहीत करेल अशा महिलांचा ग्रामपंचायत वतीने ‘स्वच्छता क्वीन’ म्हणून प्रमाणपत्र अथवा पारितोषिक देऊन सन्मान करावा.

सदर उपक्रमात गाव स्तरीय भजनी मंडळ,नवरात्र मित्र मंडळ,तरुण मंडळ, महिला बचत गट व गावातील सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन राजेंद्र देसले प्रकल्प संचालक जलजीवन यांनी केले आहे

👉 क्लिक करुन वाचा साप्ताहिक वियजमार्ग


Post a Comment

Previous Post Next Post