शहर शिवसेनेची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी...

शहर शिवसेनेची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

शिवजयंती मिरवणुकीत ध्वनीक्षेपकास रात्री 12 पर्यंत परवानगी द्या

। अहिल्यानगर । दि.03 मार्च 2026 । सहा मार्च रोजी तिथी प्रमाणे शिवजयंती उत्सव असून मिरवणूक कालमर्यादा दोन तास शिथील करुन रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक मिरवणुकीस परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.


यावेळी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गटनेते दत्तात्रय कावरे, विक्रम राठोड, दत्ता जाधव, परेश लोखंडे, काका शेळके, अरुण झेंडे ,प्रताप गडाख आदी उपस्थित होते. 

कदम म्हणाले की, दि. 6 मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव असून नगर शहर शिवसेना सालाबाद प्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करणार आहे. मिरवणुकीसाठी इतर धार्मिक सणांना वाढवून दिलेल्या कालमर्यादनुसार दोन तास शिथील करुन रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व पारंपारिक वाद्ये वाजविण्यास व मिरवणुकीस परवानगी देण्यात यावी. 

 

ध्वनीप्रदुषण (नियंत्रण व नियमन) अधिनियम 2000 चे नियम 5 (3) व शासन निर्णय क्र. ध्वनीप्र 2000/प्र.क्र.24 ता.क्र. 3 (भाग 3) दि. 7 एप्रिल 2003 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post