कै.अरुणकाका जगताप यांना समाज रत्न, प्राचार्य रघुनाथ आगळे, इंजि.सुजाता ठुबे, इंजि.बबनराव खिलारी,सुरेश चव्हाण यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर
। अहिल्यानगर । दि.21 सप्टेंबर 2026 । अहिल्यानगर जिल्हा मराठा सेवा संघ व अहिल्यानगर जिल्हा मराठा पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी मराठा व बहुजन समाजातील ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कार्य केले आहे त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो.
यावर्षी माजी आमदार कै.अरुण काका जगताप यांना समाज रत्न पुरस्कार तर सेवानिवृत्त प्राचार्य रघुनाथ आगळे, गजराजचे संचालक सुरेशराव चव्हाण, मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी इंजि.बबनराव खिलारी व आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्षा इंजि.सुजाताताई ठुबे यांना जीवनगौरव पुरस्कार ,संत साहित्याचे अभ्यासक पारनेरचे डॉ. रफिक सय्यद यांना कर्म तपस्वी पुरस्कार ,श्रीरामपूरचे उद्योजक सुधीर नवले व माधुरी नवले, दामोदर बिर्याणी चे संचालक राजेंद्र ससे, राजमान्य फरसाण चे संचालक किरण बेरड यांची युवा उद्योजक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व मराठा पतसंस्थेचे संस्थापक व चेअरमन इंजि.डॅा.विजयकुमार ठुबे व मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजि. प्रवीण दहातोंडे यांनी दिली.
या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जाधव लॉन्स ,कल्याण रोड ,अहिल्यानगर येथे होणार आहे.कै.अरुणकाका जगताप यांनी नगर शहरात गेली 42 वर्ष उत्तमव्यावसायिक ,सामाजिक व राजकीय कार्यकर्ते म्हणून कार्य केले आहे .त्यांच्या कार्यकाळात नगरसेवक ,नगराध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक ,आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे अध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार म्हणून कार्य केले आहे .तसेच या काळात त्यांनी अनेक युवकांना व्यवसाय, रोजगारासाठी मार्गदर्शन करून उभे केले आहे.
जलसंपदा विभागातून अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेले इंजि. बबनराव खिलारी यांनी १९९५ पासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून भरीव सामाजिक काम केले आहे. तसेच अनेक वर्ष मराठा पतसंस्थेचे संचालक म्हणून कार्य केले आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नेवासा येथील सेवानिवृत्त प्राचार्य रघुनाथ आगळे यांचे कार्य उल्लेखनीय आहे. मराठा सेवा संघाच्या जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून इंजि.सुजाताताई ठुबे यांनी भरीव कार्य केले आहे .सध्या त्या आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्षा असून सिंदखेडराजा ,जि.बुलडाणा येथील जिजाऊ सृष्टीच्या उभारणीत विश्वस्त म्हणून त्यांचा बहुमोल वाटा आहे. गजराज ड्रायक्लीनच्या माध्यमातून जिल्ह्यात परिचित असलेले सुरेशराव चव्हाण यांनी समाजातील अनेक युवकांना दिशा दिली आहे याचबरोबर त्यांनी शहर सहकारी बँकेच्या माध्यमातून व हिंद सेवा मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून भरीव सामाजिक कार्य केले आहे. मराठा सेवा संघाच्या विचारांचे प्रचारक म्हणून व संत साहित्याचे अभ्यासक म्हणून पारनेर येथील डॉ. रफिक सय्यद यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना कर्मतपस्वी पुरस्कार देण्यात येणार आहे.
युवकांना उद्योगात प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी युवा उद्योजक पुरस्कार दिला जातो यावर्षी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून भरीव कार्य करणारे व सध्या दामोदर बिर्याणीचे संचालक असलेले राजेंद्र ससे तसेच पत्रकार, वेब सिरीज, लेखक साहित्यिक या माध्यमातून महाराष्ट्रात परिचित असलेले व राजमान्य फरसाण याची निर्मिती करून पूर्ण देशात आपले नेटवर्क निर्माण करणारे नगर तालुक्यातील सोनेवाडी येथील किरण बेरड व श्रीरामपूर तालुक्यातील यशस्वी हॉटेल व रिसॉर्ट उद्योजक सुधीर व माधुरी नवले यांना युवा उद्योजक पुरस्कार देण्यात येणार आहे.
आत्तापर्यंत समाजातील 25 व्यक्तींना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेले असून पुरस्काराचे यंदाचे पंधरावे वर्ष आहे.
या समारंभास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन इंजि.डॅा. विजयकुमार ठुबे, मराठा सेवा संघाचे दक्षिण जिल्हाअध्यक्ष इंजि. प्रवीण दहातोंडे व उत्तर जिल्हाध्यक्ष इंजि. विवेक लव्हाट, पतसंस्थेचे उपाध्यक्ष उदय अनभुले, गुणगौरव समारंभाचे प्रमुख ज्येष्ठ संचालक किशोर मरकड व सेवा संघाचे पदाधिकारी व पतसंस्थेचे संचालक मंडळाने केले आहे.
