चोरीच्या बॅटऱ्या विकताना आरोपी जाळ्यामध्ये; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
कोतवाली पोलिसांची गाझीनगर परिसरात मोठी कारवाई; एक तरुण ताब्यात
। अहिल्यानगर । दि.03 डिसेंबर 2025 । कोतवाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने गाझीनगर, काटवन खंडोबा परिसरात मोठी कारवाई करत, चोरीच्या मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तब्बल ४ लाख ८० हजार रुपये किमतीच्या १२ बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गाझीनगर परिसरात एक इसम त्याच्याकडील बॅटऱ्या विकण्याचा प्रयत्न करत आहे.
या माहितीच्या आधारे, पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. पंचांना सोबत घेऊन केलेल्या तपासणीत, जिशान जमीर मलीक (वय-२३, रा. गाझीनगर) नावाचा तरुण लोकांना बॅटऱ्या विकण्याबाबत विचारणा करत असताना आढळून आला.
पोलिसांनी त्याला बॅटऱ्यांच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष आरोपीचे घर तपासले.
या झडतीदरम्यान LINEAGE POWER कंपनीच्या मोबाईल टॉवरमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येकी ४०,००० रुपये किमतीच्या एकूण १२ बॅटऱ्या मिळून आल्या, ज्यांची अंदाजित जुनी वापर किंमत ४,८०,००० रुपये आहे.
सदर बॅटऱ्या चोरीच्या मालमत्तेतून आलेल्या असाव्यात असा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी जिशान मलिक याला मुद्देमालासह ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे बॅटरी चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्यांच्या टोळीला मोठा दणका बसल्याचे बोलले जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
