| अहिल्यानगर | 27 ऑगस्ट 2025 | रविवारी पहाटे अहिल्यानगर शहरातील आनंदीबाजार परिसरातील सय्यद घोडेपीर दर्ग्याच्या चौथऱ्यावर काही अज्ञात दंगेखोरांनी केलेल्या तोडफोडीमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील सामाजिक सलोखा व बंधुत्वाला धक्का देणारी ही घटना असल्याचे नमुद करत खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन निष्पक्ष चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
नगर शहरात घडलेल्या या घटनेच्या पार्श्वभुमीवर खासदार नीलेश लंके यांनी मंगळवारी पोलीस अधिक्षकांची भेट घेत निवेदन सादर केले. त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, मा. नगरसेवक योगीराज गाडे, अथर खान, प्रा. सीताराम काकडे, नलिनी गायकवाड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार नीलेश लंके यांनी निवेदनात नमुद केले आहे की, सुमारे शेकडो वर्षापासून अस्तित्वात असलेले सय्यद घोडेपीर दर्गा हे धार्मिक स्थळ हे दोनही समाजांचे सामूहिक श्रध्दास्थान आहे. या ठिकाणी झालेल्या तोडफोडीला शहरातील समाज घटकांनी दुर्देवी म्हटले असून ही कृती काही असामाजिक प्रवृत्तींचा सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने काही संशयितांना ताब्यात घेले आहे, मात्र चौकशी वेगाने करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे खा. लंके यांनी स्पष्ट केले.
शांततेचे आवाहन
अहिल्यानगर जिल्हा हा शांततेचा व बंधुत्वाचा आदर्श आहे. काही असामाजिक प्रवृत्ती वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्या तरी नागरिकांनी संयम राखावा. अफवांना बळी पडू नये आणि कायद्यावर विश्वास ठेवावा. दोषींवर निश्चित कठोर कारवाई होईल.
