बनावट चलनी नोटांचा छापखाना पोलिसांनी केला उध्वस्त
निखील गांगर्डे, सोमनाथ शिंदे यांच्यासह ६ जण ताब्यात
| अहिल्यानगर | 02 ऑगस्ट 2025 | नगर तालुका पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने बनावट चलनी नोटांचे रॅकेट उघडकीस आणत मोठी कारवाई केली आहे.
२७ जुलै २०२५ रोजी आंबीलवाडी शिवारात पाचशे रुपयांच्या बनावट नोटांसह फिरणार्या निखील शिवाजी गांगर्डे (वय २७, राहणार कुंभळी, ता. कर्जत) आणि सोमनाथ माणिक शिंदे (वय २५, राहणार तपोवन रोड) यांना महिंद्रा थार गाडीतून ताब्यात घेतले. याप्रकरणी एकूण ८८ लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत ६ आरोपींना अटक केली आहे.
सपोनि प्रल्हाद गिते यांना २७ जुलै रोजी गोपनीय माहिती मिळाली की, दोन संशयित काळ्या महिंद्रा थारमधून बनावट नोटा घेऊन आंबीलवाडी शिवारात सिगारेट खरेदी करत आहेत. पथकाने तात्काळ सापळा रचून निखील गांगर्डे आणि सोमनाथ शिंदे यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून ८०,००० रुपयांच्या बनावट नोटा जप्त झाल्या. पुढील तपासात बीड आणि छत्रपती संभाजीनगरमधून प्रदिप संजय कापरे (वय २८, रा. तिंतरवणी, ता. शिरूर कासार), मंगेश पंढरी शिरसाठ (वय ४०, रा. शिवाजी नगर), विनोद दामोधर अरबट (वय ५३, रा. सातारा परिसर), आकाश प्रकाश बनसोडे (वय २७, रा. निसर्ग कॉलनी), अनिल सुधाकर पवार (वय ३४, रा. मुकुंदनगर) आणि अंबादास रामभाऊ ससाणे (रा. टाकळी, ता. शेवगाव, फरार) यांना निष्पन्न केले. \
पोलिसांनी ५९ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा, २ लाख १६ हजार रुपयांचे कागद आणि शाई, तसेच २७ लाख ९० हजार ६०० रुपय किंमतीचे मशीन, संगणक आदी साहित्य जप्त केले. एकूण ८८ लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. अंबादास ससाणे फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.