प्रवरा, मुळा दुथडी; धरणसाठे भरण्याच्या मार्गावर


| अहिल्यानगर | दि. २९ जुलै २०२५ | उत्तर नगर जिल्ह्यातील शेती आणि उद्योगधंद्यांना संजीवनी देणार्‍या भंडारदरा व मुळा धरण पाणलोट क्षेत्रात श्रावणसरींनी दमदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी सुरू झालेल्या संततधार पावसाचा जोर रविवारीही कायम राहिल्याने दोन्ही धरणांमध्ये पाण्याची आवक वेगाने वाढू लागली आहे.

धरणक्षेत्रात मुसळधार पावसामुळे मुळा व प्रवरा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. डोंगरदर्यांतील धबधबे पुन्हा एकदा सजीव झाले असून ओढे-नाले भरभरून वाहत धरणांत विसावत आहेत. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

भंडारदरा धरणात २४ तासांत ७२३ दलघफूट पाण्याची आवक झाली. धरणातील एकूण साठा ९५४१ दलघफूट (८६.४३ टक्के) इतका झाला आहे. नियमानुसार जुलै अखेर ८५ टक्क्यांपेक्षा जास्त साठा झाल्यास नियंत्रित विसर्ग सुरू केला जातो. त्यानुसार भंडारदरातून  ९६४१ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता, जो सायंकाळपर्यंत ९३२९ क्युसेक्सपर्यंत चालू होता.

पावसाचा हा जोर असाच टिकून राहिल्यास दोन्ही धरणे लवकरच पूर्ण क्षमतेने भरतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे शेतकर्‍यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला असून खरीप हंगामाला गती मिळणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post