।अहिल्यानगर । दि.16 एप्रिल 2025। नागरिकांना पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देण्याबरोबरच जलसाक्षरता वाढीसाठी १५ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ चे जिल्हाभरात थाटात उदघाटन करण्यात आले.
राहुरी तालुक्यामध्ये मुळाधरण स्थळी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते या पंधरवड्याचे उदघाटन करण्यात आले. जल हेच जीवन असून प्रत्येकाने पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
संगमनेर तालुक्यामध्ये आमदार अमोल खताळ यांनी 'जलव्यवस्थापन कृती पंधरवडा' चे उदघाटन करत या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गावा-गावापर्यंत पोहोचत नागरिकांच्या पाण्याविषयीच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
अकोले तालुक्यात निळवंडे धरणस्थळी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी पंधरवड्याचे उदघाटन केले. तालुक्यातील जनता शेती व्यवसायावर अवलंबून असून त्यांच्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पाणी हे जीवन असल्याने त्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व प्रत्येकाने जाणून घेण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
नेवासा तालुक्यामध्ये आमदार विठ्ठल लंघे यांच्या हस्ते पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी पाण्याचे महत्व समजून घेण्याची आणि जलसंवर्धन करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
पारनेर तालुक्यामध्ये आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. जलसाक्षरता वाढीसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे ते म्हणाले.
श्रीगोंदा तालुक्यामध्ये आमदार विक्रम पाचपुते यांच्या हस्ते पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. हा केवळ एक उपक्रम न राहता पाणी बचतीची लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राहाता तालुक्यामध्ये माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या हस्ते या पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. कोपरगाव येथे गोदावरी दुधसंघाचे चेअरमन आबासाहेब परजणे यांच्या हस्ते या पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला.
शेवगाव तालुक्यामध्ये उप विभागीय अधिकारी प्रसाद मते यांच्या हस्ते, श्रीरामपूर येथे उप विभागीय अधिकारी किरण सावंत यांच्या हस्ते, कर्जत-जामखेड तालुक्यामध्ये तहसीलदार गुरू बीराजदार आणि पाथर्डी तालुक्यामध्ये तहसीदार उद्धव नाईक यांच्या हस्ते या पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला.