राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्ह्याला तीन पुरस्कार
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
तत्कालिन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, मुख्याधिकारी विकास नवले आणि मंडळ अधिकारी मोहसीन शेख यांना पुरस्कार
| अहिल्यानगर | दि.22 एप्रिल २०२५ | राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्ह्याला तीन पुरस्कार प्राप्त झाले असून सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तत्कालिन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवले आणि राहता येथील मंडळ अधिकारी मोहसीन शेख यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.
जिल्ह्यात अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या उपक्रमाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. २०२३-२४ च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत तत्कालिन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२०२४-२५ साठी शासकीय अधिकाऱ्यांमध्ये देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवले, तर शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये राहाता येथील मंडळ अधिकारी मोहसीन शेख यांनाही प्रत्येकी ५० हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी कामकाजात संगणकीय प्रणालीच्या उपयोगावर भर दिला. जिल्हा प्रशासनाने गौणखनिज, ई रेकॉर्डस, इक्युजे कोर्ट प्रणाली, ई ऑफीस, 'जलदूत' पाणी टंचाई व्यवस्थापन, भुसंपादन यासारख्या अनेक उपक्रमांमध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा वापर केला.
मंडळ अधिकारी मोहसीन शेख यांच्या महसूलविषयक पुस्तकांच्या राज्यातील पहिल्या क्युआर कोड वाचनालयासाठी त्यांना पुरस्कृत करण्यात आले. अधिकाऱ्यांनी लिहिलेली ११ पुस्तके नागरिकांसाठी क्युआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवले यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली प्रवरा नगरपरिषदेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरालगतच्या ३० गावांसाठी सक्शन मशिनद्वारे मैला उपसा व गाळ व्यवस्थापन यासाठी पंचायत समिती राहुरी व संबधित ३० ग्रामपंचायती यांच्याशी करारनामा केला. यामुळे ग्रामीण व शहरी स्वच्छता सुधारण्यास मदत होणार आहे.