। अहिल्यानगर । दि.12 एप्रिल 2025। येथील दिगंबर जैन मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून 70 हजारांची रोकड व 7 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले होते. बुधवारी पहाटे ही घटना घडली. कोतवाली पोलिसांनी तत्काळ गुन्ह्याचा तपास करत दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून सुमारे एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तपासात चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
मंगळवारी रात्री ते बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी महाजन गल्ली येथील महावीर स्वामी दिगंबर जैन मंदीरात अज्ञात चोरट्यांनी पहिल्या मजल्यावरील पाठीमागच्या दरवाजाचे लॉक तोडून प्रवेश करत चोरी केली. जैन मंदीराचे अध्यक्ष महावीर झुंबरलाल बडजाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच कोतवाली पोलिसांनी तपास करत संशयीत आरोपी हे भीमा कोरेगाव येथे असल्याची माहिती मिळवली. पथकाने भीमा कोरेगाव येथे जाऊन दोन संशयीत आरोपींना ताब्यात घेतले. सुरज उर्फ सोमनाथ राजु केदारे (वय 21, रा. बोल्हेगाव) व मोन्या उर्फ प्रज्ञेश शशिकांत शिंदे (वय 20, रा. वैष्णवनगर, केडगाव) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली देवून चोरीचा मुद्देमाल काढून दिला. तसेच, तपासात त्यांनी आणखी एक गुन्हा केल्याचे उघड झाले आहे.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग