। अहिल्यानगर । दि.04 एप्रिल 2025। विदेशी दारूच्या बाटल्याने भरलेला कंटनेर नगर तालुका पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा आणि उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करून पकडला. कंटेनरमध्ये रॉयल ब्लु कंपनीच्या 52 हजार 560 बाटल्या होत्या. या कारवाईत 84 लाख 9 हजार 600 रूपये किंमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई नगर-दौंड रस्त्यावरील खडकी शिवारात गुरूवारी सायंकाळी सात वाजता करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोसि निरीक्षक दिनेश आहेर, नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते, उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस अधीक्षक सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक घुगे, कुसळे, उपनिरीक्षक रूपेश चव्हाण, उपनिरीक्षक नवनाथ घोडके, रवींद्र जाधव, रवींद्र झोळ, उत्पादन शुल्कचे जवान गणेश पडवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ शाहिद शेख, पोहेकॉ अरूण गांगुर्डे, गणेश धोत्रे, सागर मिसाळ यांनी ही कारवाई केली.
गुरूवारी (दि.3) सायंकाळी सात वाजता दौंड रस्त्याने एक कंटनेर (केए 25, एबी 5165) नगरकडे येत आहे. कंटनेरमध्ये विदेशी दारू आहे, अशी माहिती प्राप्त झाली होती. त्यावरून नगर तालुका पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी संयुक्तपणे कारवाई करीत 84 लाख 9 हजार 600 रूपये किंमतीची विदेशी दारू जप्त केली. दौंड रस्त्यावर खडकी शिवारात पथकाने सापळा रचला असता, सदरचा कंटेनर येताना दिसला.
कंटेनरला थांबवले असता, कंटनेरचा चालक कंटनेर रस्त्यावर सोडून उसाच्या शेतात पळून गेला. पथकाने कंटनेरची तपासणी केली असता त्यामध्ये 84 लाख 9 हजार 600 रूपये किंमतीच्या रॉयल ब्लू कंपनीच्या 52 हजार 560 दारूच्या बाटल्या होत्या. दारूच्या बाटल्या तसेच 21 लाखाचा कंटनेर आणि 10 हजाराचा एक मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.