गेवराई तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत कामे
वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदाराचा काळ्या यादीत समावेश
- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
| मुंबई | दि.25 मार्च 2025 | बीड जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत १७७ योजना राबवल्या जात आहेत. या अंतर्गत गेवराई तालुक्यातील ४५ आणि माजलगाव तालुक्यातील २९ गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी निविदा प्रक्रियेनंतर मे. प्रगती कन्स्ट्रक्शन या कंपनीला कामे मंजूर करण्यात आली. कामाची प्रगती असमाधानकारक असल्यामुळे मे. प्रगती कन्स्ट्रक्शन या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
याबाबत सदस्य विजयसिंह पंडित यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री पाटील म्हणाले, जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी शासनामार्फत बीड जिल्हा परिषदेकरीता टाटा कन्स्लटन्सी सर्विसेस व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांकडील कामांकरिता नॅबकॉन्स या त्रयस्थ संस्थेची तांत्रिक तपासणी करण्याकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. या त्रयस्थ कंपनीद्वारे या योजनेच्या विहित टप्प्यांवरील कामांची तपासणी करण्यात येते व तपासणी अहवालामध्ये काही दोष, त्रुटी आढळून आल्यास त्यांची पुर्तता संबंधित कंत्राटदारामार्फत त्याच खर्चातून करण्यात येते.