‘वंचित’कडून ‘ईव्हीएम’ हटाव मोहीम सुरू
जनआंदोलन उभारण्यासाठी सुरू केली स्वाक्षरी मोहीम
। अकोला । दि.04 डिसेंबर 2024 । विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमवर प्रचंड प्रमाणात संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घेत ईव्हीएम हटाव मोहीम सुरू केली आहे.
याप्रकरणात वंचितकडून जनआंदोलन उभारण्यात येणार आहे, त्यासाठी स्वाक्षरी मोहीम वंचितकडून राबवण्यात येत आहे. त्याची सुरूवात अॅड. आंबेडकर यांनी मंगळवारी स्वाक्षरी करून केली. त्यांनतर अकोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून स्वाक्षरी करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पोर्शभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून 3 ते 16 डिसेंबर पर्यंत राज्यात ईव्हीएमविरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.
आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ईव्हीएमविरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 2004 पासून अॅड. आंबेडकर यांच्या नेतृत्वात ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. ईव्हीएमच्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत.
