विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी, शेतकरी व कष्टकऱ्यांनाच प्राधान्य राहील : मुख्यमंत्री


| सोलापूर | दि.15 जुलै २०२४ |  राज्य शासनाने वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्ग, विसावा व मुक्कामाची ठिकाणासह पंढरपूर शहरात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला सुचित केलेले होते. येथे वारकरी, शेतकरी व कष्टकरी यांचा त्रिवेणी संगम झालेला आहे व हे शासन ही त्यांचेच आहे. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी व्हीआयपी पेक्षा वारकरी, शेतकरी व कष्टकऱ्यांनाच प्राधान्य राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात आषाढी वारीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळीसार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे, आमदार समाधान आवताडे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, 

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, नगरविकाचे उपसचिव तथा समन्वयक अनिरुद्ध जवळेकर, आरोग्य उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी प्रशांत जाधव तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भावी येतात व दर्शन रांगेत 18  तास उभे राहतात अशा भाविकांना दर्शनाला प्राधान्य मिळाले पाहिजे या दृष्टीने व्हीआयपी दर्शन बंद करण्याबाबत शासन प्रशासनाच्या पाठीमागे ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंढरपूर मध्ये येत असताना रस्त्याने देखील  वारकऱ्यांच्या सगळीकडे दिंड्या पालख्या येत होत्या व एक भक्तीमय वातावरण होते. 

पालखी मार्ग व पंढरपूर शहरातील सर्व रस्ते स्वच्छ होते. परंतु प्रशासनाने चेंजिंग रूम ची संख्या वाढवावी तसेच चंद्रभागा नदीच्या दोन्ही बाजूला कचराकुंड्याची संख्या वाढवावी, आवश्यक मनुष्यबळ वाढवावे व संपूर्ण चंद्रभागा वाळवंट परिसर स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी. पंढरपूर शहरातील एकाही पोलवर कोणाचेही कट आउट लावले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी व रस्ते मोकळे ठेवावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

Post a Comment

Previous Post Next Post