वसंत मोरे यांनी हाती बांधले 'शिवबंधन'

। मुंबई । दि.10 जुलै 2024 ।  मनसेला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा लढवणारे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मंगळवारी अधिकृतरित्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. 

पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसमवेत आणि मनसेतून त्यांच्यासोबत शिवसेनेत आलेल्या पदाधिकार्‍यांसमवेत मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले. यावेळी, बर्‍याच दिवसांनी पाऊस आला, आणि पावसासोबत वसंतही आला, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वसंत मोरेंचे स्वागत केले.

तर, उद्धव ठाकरेंनीही वसंत मोरेंचे पक्षात स्वागत करताना, तुम्ही सर्वजण जुने शिवसैनिक आहात, तुमचा पक्षात प्रवेश नसून स्वगृही परतत आहात. मात्र, तुम्हाला शिवसेना सोडल्याची शिक्षा द्यायला हवी, असे म्हणत आता पुण्यात शिवसेना आणखी वाढवा, हीच जबाबदारी मी देत असल्याचे म्हटले.

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्याहस्ते वसंत मोरेंसह त्यांच्या समर्थकांनी शिवबंधन बांधले. यावेळी, शिवसेना नेते संजय राऊत, आमदार सचिन अहीर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post