दूध दरवाढीसाठी शहराच्या रस्त्यावरुन निघाली ‘ट्रॅक्टर रॅली‘


| अहमदनगर | दि. 07 जुलै २०२४ | खा. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाच्या रविवारी, तिसऱ्या दिवशी आंदोलनास पाठींबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी नगर शहरातून काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीमुळे चक्का जाम होऊन  वाहतूकीची कोंडी झाली.  


दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर रॅलीस सुरूवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालय, सुरभी हॉस्टिपल, डीएसपी चौक, स्टेट बँक चौक, चांदणी चौक, बसस्थानक, हॉटेल राज पॅलेस पासून टिळक रोड, नेप्ती नाका, दिल्ली गेट, अप्पू हत्ती चौक मार्गे ही रॅली पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचली.

रॅलीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. खा. नीलेश लंके हे स्वतः ट्रॅक्टर चालवत या रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीमध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता. दरम्यान, विशेषतः रविवारी सकाळी ट्रॅक्टर नगरकडे निघाल्याने नगर - पुणे व नगर - कल्याण महामार्गावरही वाहतुकीची कोंडी झाली होती.

 मा. आ. राहुल जगताप म्हणाले, या प्रश्‍नासाठी खा. लंके यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबू नये.  झोपी गेलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी गाजावाजा करावा लागेल गोंधळ घालावा लागेल. कांदा, साखर निर्यातबंदी करून केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांची आडवणूक करीत असल्याचे जगताप यांनी सांगितले.  

रविवारी मेहबूब शेख, प्रभावती घोगरे, मा. आ. राहुल जगताप, मा. आ. भानुदास मुरकुटे, घनश्याम शेलार, अरूण कडू, मा. आ. साहेबराव दरेकर, गोविंद मोकाते यांच्यासह जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरील नेतेमंडळींनी आंदोलस्थळी हजेरी लावत पाठींबा दर्शविला.

 

Post a Comment

Previous Post Next Post