जिल्हा परिषदेत घाणीचे साम्राज्य; दर्जाहीन ठेकेदारी चव्हाट्यावर!

 जिल्हा परिषदेत घाणीचे साम्राज्य; दर्जाहीन ठेकेदारी चव्हाट्यावर!

। निविदा मॅनेजच्या प्रकारात वाढ

। कर्मचार्‍यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता


। अहमदनगर । दि.27 जून 2024 । जिल्हा परिषदेत अनेक कामे निविदेद्वारे अथवा ई-निविदेद्वारे देण्यात येतात. परंतु, ठेकेदार दर्जाहीन कामे करत असल्याचा आरोप अनेकदा होतो. त्यातच आता जिल्हा परिषदेमधील स्वच्छतेच्या कामाचा दर्जादेखील अधिकार्‍यांनी तपासून पाहिला पाहिजे, अशी मागणी होत आहे. वास्तविक ‘त्या’ ठेकेदाराचे ‘प्रोटेक्ट’ कोण करतो आहे, हे देखील तपासण्याची वेळ आली आहे. स्वच्छतेसाठी एकाची निविदा मंजूर झाली आहे. परंतु, दर्जाहीन कामे करत असल्याचे चित्र सध्या जिल्हा परिषदेतील परिसरात दिसून येत आहे. यातुन कर्मचार्‍यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

जिल्हा परिषदेच्या आवारातील जुन्या चार इमारती व नवीन प्रशासकीय इमारत अशा सर्व इमारतीमधील व आवारातील संपूर्ण साफसफाई व स्वच्छतागृहांची 12 महिन्याच्या कराराने ई-निविदा कार्यप्रणालीद्वारे देण्यात आले आहेत. मात्र, या संस्थेकडून कामांचा दर्जा राखला जात नसल्याचे वारंवार कर्मचार्‍यांनी तक्रारी केल्या आहेत. परंतु, या संस्थेला नेमके कोण ‘अभय’ देत आहे. जुन्या आणि नव्या इमारतींमध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.

जुन्या इमारतीच्या मागील बाजूस तर प्लास्टिकच्या बाटल्या, दारुच्या बाटल्यांचा खच पडला आहे. परंतु, या ठिकाणी ठेकेदाराला वा संस्थेला लक्ष देण्याची गरज वाटत नाही. तसेच त्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्याची त्यांची इच्छा नसल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. वास्तविक पाहाता या परिसरात बांधकाम विभागाचे देखील कार्यालय आहे. परंतु, त्यांचे देखील या परिस्थितीकडे दुर्लक्ष होत आहे.

पावसाळ्याचे दिवस असल्याने यामधून डासांची देखील संख्या वाढली आहे. पावसाळ्यामध्ये कचर्‍याच्या कारणावरुन कर्मचार्‍यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाचे दिवस असल्याने कचरा अथवा अन्य वस्तू साठवून ठेवणे, ही कर्मचार्‍यांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. मात्र, या परिस्थितीवर कोणीच काहीही बोलण्यास तयार नाही. एकंदरीत बांधकाम विभागाकडून ठेकेदाराला  जिल्हा परिषदेतील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या आरोग्याचे त्या संस्थेला काहीच देणे घेणे नसल्याचे दिसत आहे.

त्यातच काही अधिकारी त्या संस्थेला अभय देतात की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जुन्या इमारतींची जशी अवस्था आहे तशीच काही अवस्था ही नवीन इमारतीच्या मागील बाजूस अथवा आपत्कालीन रस्त्याच्या ठिकाणी देखील आहे. परंतु या परस्थितीवर बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज असताना त्याकडे म्हणावे तसे लक्ष देताना बांधाकाम विभाग दिसत नाही, याचेच अनेकांना आश्चर्य वाटत आहे. एकंदरीत ती संस्था जिल्हा परिषदेत ‘फॅसेलीटी‘ (योग्य सुविधा) देण्याच्या कामात अयशस्वी ठरली आहे.

कर्मचार्‍यांच्या आरोग्याचा विचार करावा
जिल्हा परिषद बांधकाम विभागाने जुन्या चार इमारतीसह एक नविन इमारतीचे काम ज्या संस्थेवर सोपवले आहे, ती संस्था योग्य पध्दतीने काम करते काय याचा देखील मागोवा घेण्याची गरज आहे. तसेच जिल्हा परिषदेने दिलेल्या आटी व शर्ती या संस्थेकडून पाळल्या जातात का याचा देखील विचार करण्याची वेळ आजची अस्वच्छता पाहुन करण्याची वेळ आली आहे.

शिक्षण विभागाचा विचार करण्याची गरज
जिल्हा परिषदेची जुनी इमारत येथे शिक्षण विभाग असून या ठिकाणी छत गळत असल्याचे अनेकदा पाहिला मिळाले आहे. तसेच या ठिकाणी चौकशी केली असता या ठिकाणी काम करण्यासाठी पत्र दिल्याची माहिती देखील आहे. परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभाग याकडे जणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचे सध्या चित्र आहे.

Post a Comment

Previous Post Next Post