। टाकळीमिया । 19 मे 2024 । चालू वर्षी खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे. खरिपात शेतकरी विविध पिके घेतात. मात्र, लागवड करत असताना बियाणांची योग्य निवड करावी. बियाणांबाबत विशेष दक्षता घेण्याचे आवाहन, राहुरी कृषी विभाग व टाकळीमिया येथील कृषिसहाय्यक शिवप्रसाद कोहकडे यांनी केले.
कोहकडे यांनी सांगितले की, बी- बियाणे आणि खते औषधे यांची निवड शेतीच्यादृष्टीने अत्यंत महत्वाची ठरते. बियाणे निकृष्ट प्रतीचे लागले, तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. गेल्या काही वर्षांपासून यासंदर्भातील सुरु असलेल्या जनजागृतीमुळे शेतकरी अभ्यासू झाले असले तरी बियाणांचा प्रश्न तसाच आहे. दरवर्षी कुठे ना कुठे निकृष्ट बियाण्यांबाबतच्या तक्रारी होतच राहतात. यासाठी शेतकऱ्यांनी सावधानता बाळगणे महत्त्वाचे ठरते.
पिशवीतील किंवा बॉक्समधील बियाणे पेरणीसाठी वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. बियाण्याची पिशवी ही नेहमी खालच्या बाजूने फोडावी. म्हणजेच ज्या बाजूला टंग असेल. ती बाजू तशीच राहू द्यावी. तसेच बॉक्स असेल तर तर त्यावरील माहिती सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी. बियाण्याचा थोडा नमुना पिशवी किंवा बॉक्समध्ये राखून ठेवावा. म्हणजे बियाणे सदोष आढळल्यास तक्रार केल्यानंतर तपासणी अधिकाऱ्यांना सदर बियाण्याचा नमुना देता येईल.
ज्या वेळेस आपण प्रमाणित बियाणे खरेदी करतो, त्या बियाण्याच्या पिशवीवर किंवा टॅगवर प्रमाणित केलेल्या प्रमाणकापेक्षा किंवा दिलेल्या माहितीप्रमाणे जर बियाण्यांची गुणवत्ता नसेल, तर त्यास सदोष बियाणे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने त्याची उगवणक्षमता पोषक परिस्थितीत पेरल्यानंतर खूपच कमी असेल, तर बियाणे सदोष आहे असे समजावे. त्याची भौतिक शुद्धता म्हणजेच त्यातील काडीकचरा, इतर पिकांचे बियाणे, तणांचे बी यांचे प्रमाण टॅगवरील माहितीपेक्षा जास्त असल्यास सदर बियाणे सदोष आहे असे समजावे.
सदर बियाण्याची अनुवांशिक शुद्धता नसल्यास म्हणजेच बियाण्याचा एकसारखेपणा, झाडांचे बाह्य गुणधर्म यामध्ये एकसारखेपणा नसल्यास तसेच झाडांची कणसे, शेंगा, ओंब्या, फळे यामध्ये विविधता आढळल्यास सदर बियाणे अनुवांशिकदृष्ट्या अशुद्ध आहे असे म्हणतात.
तसेच शेतकऱ्यांनी वातावरणातील बदलाचा विचार करूनच बियाण्याची निवड करावी. कारण जरी बियाणे शुद्ध असले तरी वातावरणातील बदलामुळे देखील काहीवेळा अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. शेतकरी असे बियाणे सदोष असल्याचे समजतात, अशी माहितीही त्यांनी दिली.
Tags:
Ahmednagar
