धावत्या पिकअप मधून पडून युवकाचा मृत्यू


। अहमदनगर । दि.30 मे 2024 । धावत्या पिक अप गाडीचा दरवाजा अचानक उघडल्याने क्लिनर साईडला बसलेल्या युवकाचा रस्त्यावर पडून मृत्यू झाल्याची घटना शहराबाहेरील बायपास रस्त्यावर वाळूज गावच्या शिवारात पहाटे 2 वाजेच्या सुमारास घडली.

बाळाजी माधव साकटवाड (वय 29, रा. मुखेड, जि. नांदेड) असे मयताचे नाव आहे. मयत बाळाजी व त्याचा चुलत भाऊ माधव ज्ञानोबा साकटवाड हे दोघे सोमवारी पहाटे पिकअप गाडी घेवून बायपास रस्त्याने जात होते. माधव हा गाडी चालवत होता तर बाळाजी हा क्लिनर साईडला बसलेला होता.

वाळूज शिवारातील पुलाखाली बाळाजी याच्या बाजूचा दरवाजा अचानक उघडला गेला. त्यामुळे तो पिकअप मधून खाली रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले.

मात्र तेथील मेडिकल ऑफिसर डॉ. कुलकर्णी यांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात सी आर पी सी 174 प्रमाणे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post