सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज राहा : उपमुख्यमंत्री

सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज राहा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी येथे दीक्षान्त संचलन संपन्न

 

। नाशिक । दि.04 ऑगस्ट  2023 । नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी ही देशातील उज्ज्वल नावलौकिक असलेली प्रबोधिनी आहे. या प्रबोधिनीत प्रशिक्षण घेऊन देशसेवेत येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांसमोर सायबर व आर्थिक स्वरुपाच्या गुन्हेगारीची आव्हाने असल्याने ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज राहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

आज महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक 122 च्या दीक्षान्त संचलन कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहूल आहेर, राहूल ढिकले, पोलीस महासंचालक रजनिश सेठ, अपर पोलीस महासंचालक राजेश व्हटकर, अर्चना त्यागी, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेशकुमार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, येणारा काळ आव्हानांचा असून रस्ते गुन्हेगारी सोबतच सायबर व आर्थिक गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी या प्रशिक्षण प्रबोधिनीतून चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळाले आहे. या प्रबोधिनीतून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारे पोलीस हे देशसेवेत आपले कर्तव्य बजावताना नेहमीच अग्रस्थानी असतात. आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करून प्रतिष्ठेसोबतच समाजाप्रति निष्ठा बाळगून आपली व देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.

लोकांच्या सेवेकरिता आपण पोलीस दलात रुजू झालो आहोत, शिस्तीत काम करीत असताना संवेदना जिवंत ठेवल्यास आपण कर्तव्यास निश्चितपणे न्याय देऊ शकाल. समाजात गुणवत्तापूर्ण सेवेची संधी आपल्याला मिळाली आहे. या संधीच्या माध्यमातून आपण आपल्या कामाने, जनतेची शाबासकी मिळविणे हेच आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण मेडल असेल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post