सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत धोरणात्मक निर्णय घेणार : मंत्री उदय सामंत


। मुंबई । दि.27 जुलै 2023 । राज्यातील सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य अमिन पटेल यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या सफाई कामगारांच्या अडचणींबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, बृहन्मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील 27 हजार 900 सफाई कामगार कर्मचाऱ्यांपैकी 5हजार 592 सफाई कर्मचाऱ्यांना सेवा सदनिकांचे वाटप करण्यात आले आहे. ही सेवानिवासस्थाने बरीच जुनी असल्यामुळे तसेच इतर सफाई कर्मचाऱ्यांना सेवानिवास्थाने प्राप्त होण्याकरिता मुंबई महापालिकेमार्फत ‘आश्रय योजना’ राबविण्यात येत आहे. 

या योजनेअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांच्या 30 वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत 30 वसाहतींपैकी 15 वसाहती रिक्त करण्यात आल्या असून पुनर्विकासाचे काम प्रगतीपथावर आहे. या पुनर्विकासांतर्गत जवळपास 12 हजार सेवा सदनिका उपलब्ध होणार आहेत.

या लक्षवेधी सूचनेत सदस्य यामिनी जाधव, संजय केळकर, प्रणिती शिंदे यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post