बंद पथदिव्यांच्या निषेधार्थ शिवसेनेने आयुक्तांना दिला कंदील भेट
कारभारात सुधारणा न झाल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरतील : विक्रम राठोड
। अहमदनगर । दि.26 जुलै 2023 । शहर आणि उपगरातील सावेडी, प्रोफेसर कॉलनी चौकातील बंद पडलेले पथदिवे तात्काळ सुरु करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने मनपा आयुक्तांना कंदील भेट देण्यात आला.
याप्रसंगी युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष माजी महापौर अभिषेक कळमकर (शरद पवार गट), नगरसेवक बाळासाहेब बोराटे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरिष ज़ाधव, दत्ता जाधव, अमोल येवले, अशोक दहिफळे आदिंसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर शहरातील अनेक भागात विशेषत: उपनगरात पथदिवे बंद असतात. कोट्यवधी रुपये खर्च करून मनपाने संपूर्ण शहराचे पथदिवे बदलले. त्याची दुरुस्ती आणि देखभालीचे टेंडर एका खाजगी ठेकेदार कंपनीला दिले.
मनपाचे वाढत चाललेले वीज बिल कमी करण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकली. हे विजेचे बिल वाचविण्यासाठी ठेकेदारच आळीपाळीने पथदिव्याच्या वीज पुरवठा बंद तर ठेवत नाही ना याची देखील खातरजमा आपण करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी विक्रम राठोड म्हणाले, शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत, त्यात स्ट्रीट लाईटही बंद असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मनपाचा या ठेकेदारावर वचक राहिलेला नाही. त्यामुळे मनपा व नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होत होत आहे. पालिकेच्या कारभारात सुरु असलेला दिव्याखालचा अंधार दूर करावा अन्यथा शिवसेना स्टाईलने शिवसैनिक रस्त्यावर उतरेल असेही त्यांनी म्हटले आहे.
